बेधुंद ‘डिजे’ वाहन चालकाने वरातीलाच चिरडले! संगमनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना; दोघे जागीच ठार तर तिघे अत्यवस्थ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या सर्वत्र विवाह सोहळ्यांची धूम सुरु असतांनाच संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. धांदरफळ येथील नवरदेव लग्नासाठी निघाला असता निघालेल्या वर मिरवणुकीत बेधुंद झालेल्या डिजे वाहनाच्या चालकाने अचानक वेग वाढवल्याने त्याखाली सुमारे 10 ते 15 वराती चिरडले गेले. या दुर्दैवी घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण जखमी झाले आहेत, त्यातील तिघांची स्थिती गंभीर असल्याचे समजते. या घटनेनंतर काही क्षणापूर्वी सुरु असलेल्या मंगल सोहळ्यावर शोककळा पसरली. जखमींना तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.


याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज (ता.4) सायंकाळी चारच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ यथे घडली. येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी (ता.5) रणखांब येथे लग्न आहे. त्यासाठी आज दुपारी नवरदेवाची वाजतगाजत पाठवणी सुरु होती. ही मिरवणूक ऐन रंगात आलेली असतांना अचानक मिरवणुकीतील डिजेच्या (क्र.एम.एच16/ए.ई.2097) वाहन चालकांमध्ये अदलीबदली झाली. नव्याने चालक म्हणून बसलेल्या इसमाने अचानक वाहनाचा वेग वाढवला.


त्यामुळे मित्राचे, नातेवाईकाचे लग्न म्हणून आनंदाने नाचणार्‍या आणि बेसावध असलेल्या वर्‍हाड्यांना काही समजण्यापूर्वीच त्या वाहनाखाली 10 ते 15 जण चिरडले गेले. त्यातील बाळासाहेब हरीभाऊ खताळ (वय 48, रा.धांदरफळ खुर्द) हा तरुण वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. तर, भास्कर राघु खताळ (वय 73) यांच्यावर उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत रामनाथ दशरथ काळे, गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान राबवा खताळ, भारत भागा खताळ, सागर शंकर खताळ, गणेश संतोष ठोंबरे, सोनाली बाळासाहेब खताळ व आशा संजय खताळ असे आठजण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


या घटनेने दोन्ही धांदरफळसह संपूर्ण संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली असून काही क्षणांपूर्वी आनंदाचे, मंगल वातावरण असलेल्या धांदरफळ खुर्दसह रणखांबमध्येही शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

Visits: 10 Today: 2 Total: 22906

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *