अभिवाचनातून वाचन संस्कृती वाढवणारे अनिल सोमणी
पुस्तकांच्या वाचनातून वाचन चळवळीला प्रोत्साहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समृद्ध समाज घडवण्यासाठी वाचन अत्यंत गरजेचे असून सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तरुणांचे वाचन कमी झाले हे चिंताजनक आहे. नव्या पिढीला वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरता निवृत्त नायब तहसीलदार अनिल सोमणी यांनी आपल्या ९१ पुस्तकांच्या केलेल्या अभिवाचनातून वाचन चळवळीला बळकटी दिली आहे.

महाराष्ट्राला शूरवीर, थोर समाज सुधारक, संत आणि विचारवंतांची मोठी परंपरा आहे. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे यांची समृद्ध परंपरा असताना सोशल मीडियाच्या जमान्यात मात्र तरुणाई वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे. जीवन समृद्ध होण्यासाठी वाचन अत्यंत गरजेचे असून ही चळवळ पुन्हा पुनरुज्जित व्हावी याकरता दुर्गा तांबे यांनी संगमनेर मध्ये अनेक वाचन ग्रुप निर्माण केले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सेवा देत असलेले निवृत्त नायब तहसीलदार अनिल सोमणी यांनी वाचन चळवळीचे व्रत हाती घेऊन अभिवाचनातून या चळवळीला नवे बळ दिले आहे. याचबरोबर संगमनेर साहित्य परिषदेच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढीस लागावी याकरता ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामध्ये अनेक साहित्यिक लेखक व पत्रकार बांधवांचा समावेश आहे.

कोरोना संकटाच्या काळात वाचनाला अधिक लोकप्रियता मिळावी याकरता निवृत्त नायब तहसीलदार यांनी अभिवाचनाचा छंद जोपासला. श्यामची आई, पासून सुरू केलेले अभिवाचन अत्यंत लोकप्रिय झाले. यानंतर विविध मासिके आणि ९१ पुस्तकांचे त्यांनी अभिवाचन केले. त्यापैकी अहमदनगर आकाशवाणीवर अनेक पुस्तकांचे अभिवाचन प्रकाशित झाले. अत्यंत गोड आणि सौम्य आवाजामध्ये अनेक पुस्तके ऐकायला मिळाल्याने नागरिकांमधून अभिवाचनाची मागणी वाढली.नर्मदेची वाघीण, रानातल्या कविता, यांच्यासह ९१ पुस्तके व विविध कविता संग्रहांचे वाचनही त्यांनी केले. तरुणांसाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. अनिल सोमणी यांच्या या अभिवाचनाचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे,आ. सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, डॉ. नितीन भांड, रामदास तांबडे, नामदेव कहांडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 71 Today: 2 Total: 1114863
