नागरिकांच्या ‘बिनधास्तपणा’मुळे संक्रमणात होत आहे दररोज वाढ! संगमनेरातील सर्व रुग्णालये बाधितांनी तुडूंब; तरीही अनेकांना गांभिर्यच नसल्याचे चित्र..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासन व प्रशासनाकडून वारंवार आवाहनानंतरही सामान्य नागरिक रस्त्यावरुन हटायचे नावं घेत नसल्याने कोविडचा संसर्ग काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांकडून नियमांच्या सक्तिसाठी दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला जात आहे, मात्र त्याचाही प्रभावी परिणाम होत नसल्याने प्रशासनही हतबल झाल्यासारखी स्थिती आहे. संगमनेरसारख्या लाखभर लोकवस्तीच्या शहरातील हे दृष्य कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी किती पोषक आहे याचेच दर्शन चौकाचौकात आणि गल्लीबोळात दिसत आहेत. एकीकडे रुग्णालये तुडूंब तर, दुसरीकडे ऑक्सिजन व औषधांसाठीची मारामार सुरु असतांना नागरिकांचा हा बिनधास्तपणा परिस्थिती चिघळवणारा ठरत आहे. कोविडने बिघडलेली आजची स्थिती किती भयानक आहे याबाबत रोज नवनवीन घटना समोर येवूनही नागरिकांमध्ये त्याचे गांभिर्य नसल्याने सवलतीच्या वेळेसह संचारबंदीच्या काळातही निर्बंध झुगारुन नागरिक रस्त्यावर येत आहेत.


गेल्या पंधरवड्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यातील कोविडची परिस्थिती अभूतपूर्व बनली आहे. देशात अचानक उसळलेल्या दुसर्‍या कोविड संक्रमणाने दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने देशभरातील रुग्णालये तुडूंब झाली आहेत. त्यातच रुग्णालयात दाखल होणार्‍या बहुतेक कोविड बाधितांना ऑक्सिजन व औषधांची नितांत गरज असल्याने देशभर एकाचवेळी त्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने या दोन्ही गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर कारण्यासाठी राज्य सरकांराना मोठे परिश्रम करावे लागत असल्याचे रोजचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्याने, औषधं अथवा रेमडेसिवीरची लस उपलब्ध न झाल्याने रुग्ण दगावल्याच्या वेदनादायी घटनाही समोर येत आहेत. बुधवारी नाशिकमधील दुर्घटनेत एकाचवेळी 24 जणांचे बळी गेल्याची घटनाही अगदी ताजी आहे.


आजच्या स्थितीत कोविड संक्रमणाचा वेग मोठा असून त्याने अनेकांना जायबंदी केले आहे. पुढील कल्पित चित्र डोळ्यासमोर ठेवून काही धनाढ्य महाभागांनी ऑक्सिजनच्या सिलेंडरसह रेमडेसिवीरच्या लशींचा घरात साठा करुन ठेवल्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशा स्थितीत निर्बंध झुगारुन रस्त्यावर दिसणार्‍या बहुतांश नागरिकांमध्ये रोजीरोटीचा संघर्ष असलेल्यांसह सामान्य माणसांचाच अधिक भरणा असल्याचे आणि त्यातही नियमांकडे दुर्लक्ष करणारेच अधिक दिसत आहेत. अशावेळी एखाद्याला संसर्ग झाल्यास त्यातून त्याचे संपूर्ण कुटुंब बाधित होण्याची आणि मग कमावलेले सगळेकाही गमावण्याची स्थिती निर्माण होवू शकते याचेही भान कोणी ठेवायला तयार नसल्याचे दृष्य दिसत आहे.


घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात 78 रुग्णांची व्यवस्था आहे. मात्र सद्यस्थितीत तेथे 90 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशावेळी बाधित झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय शिल्लक नाहीत. खासगी रुग्णालयातील रोजचा खर्च, औषधांचा, आवश्यकता असल्यास रेमडेसिवीरचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. यासर्व गोष्टींपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांचे पदोपदी कठोर पालन. मात्र तेथेच नागरिक चुका करीत असून सकाळी 7 ते 11 या शिथीलतेच्या कालावधीत देशातील जीवनावश्यक वस्तु संपल्यागत किराणा, भाजीपाला व अन्य गोष्टी घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत अनेकांच्या तोंडावरील मास्क नाकाच्या तर अनेकांच्या हनुवटीच्या खाली असल्याचेही भयानक चित्र आहे. सामाजिक अंतर नावाचा प्रकार बहुतेकांच्या गावीच नसल्याचेही दिसून येत आहे.


आजच्या स्थितीत संगमनेर शहरातील बहुतेक सर्व कोविड रुग्णालये बाधितांनी खचाखच भरलेली आहेत, ग्रामीण रुग्णालयातही एकही खाट शिल्लक नाही. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. आजही जिल्हाभरातून ऑक्सिजनची खाट मिळेल का? अशी विचारणा करणारे अनेक दूरध्वनी येतात, इतकी स्थिती खालावली आहे. यासर्व गोष्टींचा सामान्य, गरीब आणि श्रीमंत अशा सगळ्यांनीच गांभिर्याने विचार करण्याची आणि नियमांचे पालन करुन आपली व आपल्या परिवाराची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे. अन्यथा देशभरात धुमाकूळ घालणारा कोविड आपलीच प्रतिक्षा करतोय याचे स्मरण ठेवण्याची गरज आहे.


आत्मा अमर आहे, मात्र आपल्याकडे उपचार घेण्यासाठी पैसा नाही. उद्या आपणास संसर्ग झाला आणि त्यातून आपले कुटुंबच बाधित झाले तर आपल्याकडे उपचार करण्यासाठी पती, पत्नी व दोन मुले असे सहा लाख रुपये आहेत का? असतील तर मग वाट्टेल तसं फिरण्यास आणि कोविड नियमांचे उल्लंघन करण्यास हरकत नाही. पण नंतर मात्र सरकारला अथवा व्यवस्थेला दोष द्यायचा नाही. काही जणांच्या अशा प्रवृत्तीमुळेच कोविडचा प्रादुर्भाव वाढतोय. आपण असं करुन ना सरकारची मदत करतोय, ना समाजाची आणि ना स्वतःची. कोविड भयंकर आहे, त्यातून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान अटळ आहे. याचा गांभिर्याने विचार करा, सरकारच्या, प्रशासनाच्या सूचना पाळा आणि अशी सुरक्षित रहा अशी आपणास विनंती आहे.
श्रीनिवास हेमाडे
प्राध्यापक : तत्त्वज्ञान विभाग, संगमनेर महाविद्यालय

Visits: 98 Today: 1 Total: 1098179

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *