अभूतपूर्व स्थितीतही ‘ऑक्सिजन’ रोखणार्‍या पोलीस निरीक्षकाची पत्रकारावरच आगपाखड! दोन दिवस विनाकारण वाहन रोखून रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या अधिकार्‍यावर कारवाईची मागणी..


नायक वृत्तसेवा, शेवगाव
कोविडच्या वाढलेल्या संक्रमणाने राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बाधित होवून गंभिर झालेल्या रुग्णांसाठी जिवंत राहण्याचा एकमेव पर्याय असलेल्या ऑक्सिजनची राज्यासह जिल्ह्यातही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनातील सर्व घटक जीवाचे रान करीत असतांना शेवगावमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयासाठी ऑक्सिजनचे 22 सिलेंडर घेवून निघालेले वाहन शेवगाव पोलिसांनी अडवून चक्क दोन दिवस पोलीस ठाण्यात उभे केले. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीलाच लागला होता. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून अपघातग्रस्त असलेल्या शेवगावच्या तहसीलदारांनी पत्रव्यवहार केल्यानंतर सदरचे वाहन सोडण्यात आले. या प्रकाराने मात्र शेवगावसह संपूर्ण जिल्ह्यात तेथील पोलिसांच्या भूमिकेविषयी संताप उसळला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या विश्‍वसनीय माहितीनुसार सोमवारी सायंकाळी शेवगाव येथील श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयासाठी ऑक्सिजनचे 22 सिंलेडर घेवून एक टेम्पो (क्र.एम.एच.15/सी.के.1569) निघाले असता वाहनचालकाने शेवगावपासून पाच किलो मीटर अंतरावरील वारुळ या गावी आपल्या घराबाहेर काही वेळासाठी सदरचे वाहन उभे केले. या दरम्यान कोणीतरी त्या वाहनाचा सिलेंडरसह फोटो काढून त्याची माहिती शेवगाव पोलिसांना दिली. शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी तत्काळ तेथे धाव घेवून सदरचे वाहन ताब्यात घेतले. यावेळी वाहन चालकाने आपल्याकडील कागदपत्रे दाखवून सदरचे सिलेंडर श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयासाठी घेवून जात असल्याचे पोलिसांना सांगीतले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


त्यामुळे सोमवारी रात्रीपासून सदरचे वाहन शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारातच उभे करण्यात आले होते. याबाबतची माहिती श्री संत एकनाथ रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने शेवगावच्या इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिल्यानंतर त्यांनी प्रसंगाचे गांभिर्य ओळखून मंगळवारी (ता.20) शेवगावच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्रव्यवहार करुन सदरचे ऑक्सिजन सिलेंडर तातडीने श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयात पोहोचवण्यास सांगीतले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 24 तासांहून अधिक काळ चौकशीच्या नावाखाली कोणतीही चौकशी न करता अडवून ठेवलेला टेम्पो सोडला आणि रुग्णालयात दाखल असलेल्या गंभिर रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्‍वाःस सोडला.


सदरचा प्रकार अत्यंत गंभिर आहे. सध्या राज्यातील कोविडची स्थिती, त्याचा जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावावर झालेला परिणाम यांचा सारासार विचार करता शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी संबंधित रुग्णालय, ऑक्सिजनचा पुरवठा करणारा पुरवठादार, अथवा वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधून तातडीने कारवाई करणे आवश्यक होते. मात्र संबंधित अधिकार्‍याने आपल्या अधिकारांचा एकप्रकारे अतिरेक करीत आणीबाणीच्या स्थितीतही अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लावून तब्बल दोन दिवस सदरचे ऑक्सिजन सिलेंडर रोखून ठेवले. हा प्रकार कोविडने जायबंदी झालेल्या आणि गंभिर अवस्थेत शेवगावच्या श्री संत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखाच आहे. या प्रकाराने शेवगावात संताप निर्माण झाला असून या घटनेची सखोल चौकशी करुन संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.


विशेष म्हणजे मंगळवारी पुण्यातील एका खासगी कंपनीतून नगरकडे निघालेले ऑक्सिजनचे टँकर पुणे पोलिसांनी अडविले होते. त्यानंतर यंत्रणेतील सर्वांसह लोकप्रतिनिधीनींही सामुहिक प्रयत्न करुन पुणे पोलिसांच्या तावडीतून सदर टँकरची सुटका केली, त्यामुळे नगरमध्ये दाखल असलेल्या शेकडों रुग्णांना दिलासा मिळाला. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात अहमदनगर पोलिसांची भूमिका वाखाणण्यासारखी होती. असे असतांना त्याच जिल्ह्यातील एका तालुक्यात त्यापेक्षा एकदम उलट घटना घडावी याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


यासंपूर्ण घटनेचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन दैनिक सकाळचे शेवगाव प्रतिनिधी सचिन सातपुते यांनी केले. त्याचा राग मनात धरुन आपली चुक मान्य करण्याऐवजी शेवगावच्या पोलीस निरीक्षकांनी चक्क संबंधित पत्रकारालाच ‘आपण चुकीची बातमी टाकून जनतेची दिशाभूल करीत आहात, बातमी टाकणार्‍यांनी आधी खात्री करावी. अधिकृत विभागाकडूनच माहिती घेतली पाहिजे’ वगैरे म्हणत एकप्रकारे दमातच घेण्याचा प्रकार केला. त्यामुळे शेवगावमध्ये पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या भूमिकेविषयी संशयाचे वातावरण तयार झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत भारतीय जनता पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण मुंढे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यात शेवगावचे पोलीस अधिकारी मनमानी कारभार करीत असून एकीकडे जिल्हा पोलीस दल प्रशासनाच्या बरोबरीने कोविडचा मुकाबला करीत असतांना शेवगावात मात्र दुकानदारांवर दहशत निर्माण करुन त्यांच्याकडून ‘वसुली’ सुरु आहे. या भयंकर संकटातही शेवगावातील मटका, दारु, जुगार, अंमली पदार्थ व वाळु तस्करी जामात असून कायद्याची भिती मात्र सामान्य नागरिकांना दाखवली जात आहे. आपलाच कायदा समजून मनमानी करणार्‍या येथील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारा करण्यात आली आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 114808

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *