राजूरच्या कोविड सेंटरला पवार बंधूंकडून मदत

नायक वृत्तसेवा, राजूर
तालुक्यातील राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतने लोकवर्गणीतून कोविड केअर सेंटर सुरू केलेले आहे. त्यास समाजातील दानशूरांकडून मदत मिळत आहे. बुधवारी (ता.21) मुंबई येथील उद्योजक राजेंद्र, विजेंद्र व रवींद्र पवार तिघा बंधूंनी दीड लाख रुपयांचे औषधे कोविड सेंटरला भेट दिली. तर स्थानिक किरण सोनवणे यांनी रोख पाच हजार रुपयांची मदत केली.

अकोले तालुक्यात उन्हाचा चटका वाढण्याबरोबर कोरोनाची दाहकताही वेगाने सुरू आहे. रोज बाधितांच्या संख्येत नव्याने भर पडत आहे. अकोले शहर, राजूर व कोतूळ अशा बाजारपेठांच्या ठिकाणी लॉकडाऊन पाळला जात आहे. प्रशासनाबरोबर सेवाभावी संस्था आणि दानशूर हातात हात घालून कोविडचा लढा लढत आहे. अशातच राजूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या सत्तर रुग्ण असून; केंद्रास समाजातून मोठी मदत मिळत आहे. मुंबई येथील उद्योजक पवार बंधूंनी दीड लाखांचे औषधे बुधवारी केंद्रास सुपूर्द केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.रामनाथ दिघे, सरपंच गणपत देशमुख, पोलीस अधिकारी नितीन खैरनार, भास्कर येलमामे, कैलास येलमामे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नाडेकर, तलाठी ज्ञानेश्वर बांबळे, विजय पवार, बाळासाहेब देशमुख, श्रीराम पन्हाळे, पत्रकार शांताराम काळे, अक्षय देशमुख उपस्थित होते. या मदतीबद्दल दानशूरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
