संगमनेर बसस्थानक बनलेय राजकीय रणांगण!

गाळेधारक व्यापारी; ग्राहक आणि प्रवाशांचाही मनस्ताप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चांगल्या, वाईट गोष्टींनी सतत चर्चेत असणाऱे संगमनेर बसस्थानक राजकीय पुढार्‍यांनी राजकीय रणांगण बनवले आहे. सभा, निदर्शने, शिबिरे, विविध महापुरुषांच्या जयंती, आणि सर्वपक्षीयांचे विविध कार्यक्रम यामुळे बसस्थानक परिसरातील गाळेधारक व्यापारी, ग्राहक आणि प्रवासी वैतागून गेले आहेत.


संगमनेर बसस्थानक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील नावारूपाला आले आहे. गतवर्षी विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी या बसस्थानकाचा उपयोग आपल्या राजकीय आखाड्यासाठी सुरू केला आहे. परिणामी बस स्थानक परिसरात असणारे गाळेधारक व्यापारी, ग्राहक आणि प्रवासी अक्षरशः वैतागून गेले आहेत.


संगमनेर तालुक्याने राज्यात मोठी ओळख निर्माण केली आहे. संगमनेरची बाजारपेठ जिल्ह्यात क्रमांक एक वर आहे. मेडिकल हब म्हणूनही संगमनेरला विशेष ओळख मिळाली आहे. अनेक नामवंत डॉक्टर्स, आपल्या आरोग्य व्यवसायासाठी संगमनेरला पहिली पसंती देतात. मोठ मोठी कपड्याची दालने संगमनेरात असल्याने जिल्हाभरातून कपडे खरेदीसाठी ही लोक येत असतात. विविध वाहनांचे शोरूम येथे असल्याने वाहन खरेदी आणि विक्री येथे मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक जण बसस्थानकाचा उपयोग करतात. त्यातच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे देखील दररोज बसस्थानकात येत असतात. त्यामुळे हा परिसर गर्दीने नेहमीच गजबजलेला असतो.
जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शिर्डी, राहुरी, नगर यासह अनेक तालुक्यातील नागरिक याठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्याच बरोबर नाशिक, पुणे, मुंबई येथील मोठ मोठे व्यापारी सुद्धा आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी येत असून अनेक बँका देखील याठिकाणी आहेत. संगमनेरची प्रगती बघता येथे भव्य – दिव्य असे बसस्थानक उभारण्यात आले. या नवीन बसस्थानकात अनेक व्यापाऱ्यांनी व्यवसाय करण्यासाठी लाखो रुपये खर्च करत गाळे विकत घेतले आणि संगमनेरच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावला. त्यामुळे संगमनेर मध्ये नवनवीन व्यवसायिकांची व नागरिकांची संख्या वाढू लागली. संगमनेर सारखे बसस्थानक आपल्याही शहरात झाले पाहिजे अशी अनेकांची भावना होवू लागली. पुणे – नाशिक रस्त्या लगत व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे बसस्थानक असून येथील परिसर मोठा आहे. त्यामुळे या परिसरात एखादा राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रम घेतल्यास तो नागरिकांच्या नजरेस पडतो. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनाही सोयीस्कर होतो. या अनुषंगाने बसस्थानक परिसरात हळूहळू राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम होवू लागले. थोड्या फार प्रमाणात होत असलेले ह्या कार्यक्रमांमध्ये मागील एक वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.


संगमनेर विधानसभेचा निकाल लागल्यानंतर बसस्थानक म्हणजे या राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप करण्याचे मोठे व्यासपीठच बनल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही महापुरुषांची जयंती असो, वा पुण्यतिथी असो, आंदोलने, मोर्चे, शिबीरे, राजकीय सभा, तसेच विविध कार्यक्रम असो हे सर्व या ठिकाणी होवू लागले. त्याच बरोबर संगमनेर शहर व तालुक्यात कोणाचा वाढदिवस, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, उदघाटन, शिबीरे आदी कार्यक्रमांचे मोठ मोठे जाहिरात फलक (फ्लेक्स बोर्ड) बसस्थानक परिसरात लावले जातात. त्यामुळे हे बसस्थानक या फलकांमुळे हरवून गेलेले दिसते. सातत्याने होत असलेल्या याठिकाणच्या कार्यक्रमांमुळे बसस्थानकातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागले आहेत.लाखो रुपये खर्च करून व्यापाऱ्यांनी येथे गाळे घेतले. तर काही व्यापारी हजारो रुपये देऊन भाडेतत्वावर व्यवसाय करत आहेत. परंतु अशा प्रकारे कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने होत राहिल्यास आम्ही कसा व्यवसाय करायचा आणि भाडे कुठून द्यायचे असा मोठा प्रश्न या व्यापारी वर्गासमोर निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणत्याही राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी येथील व्यापारी यांनी प्रशासनाकडे केली आहे, परंतु त्यांना प्रशासन कोणतीही दाद देताना दिसत नाही. तसेच येथील वाहनतळचा (पार्किंग) विषय गंभीर बनला आहे. अनेक नागरिक आपली चारचाकी वाहने बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत उभ्या करून शहरातील दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी जातात. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या एसटी बस चालकांना बस वळवतांना मोठी कसरत करावी लागते. बसस्थानक इमारतीच्या तळ भागात शेकडो वाहने उभे करता येतील असे वाहनतळ बनवण्यात आले आहे, परंतु याचा वापर होताना दिसत नाही. या वाहनांचा देखील त्रास येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे इमारत बांधकाम ठेकेदाराने व प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीमुळे बसस्थानकाच्या परिसरातील व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून येथील व्यापाऱ्यांसह प्रवाशी देखील त्रस्त झाले आहेत. त्याच बरोबर याबाबत संगमनेरच्या सुज्ञ नागरिकांनी देखील मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

संगमनेर बसस्थानकातील व्यापारी यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी बसस्थानक व नगर पालिकेला विचारले असता ही जबाबदारी इमारत बांधकाम ठेकेदाराची असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. अनेक अडचणी असताना देखील या ठेकेदाराकडून कोणत्याही सोयी सुविधा या व्यापाऱ्यांना देण्यात येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Visits: 38 Today: 3 Total: 1110175

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *