श्रीरामपूरात गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या! आठ लाख साठ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एकजण ताब्यात..
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यासह जिल्ह्यात कोविडचे थैमान सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिक भयभित असतांनाही अवैध व्यावसायीकांचे काळे उद्योग सुरुच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूरच्या पोलीस उपअधिक्षकांनी आज श्रीराम नवमीच्या दिनी भल्या पहाटे श्रीरामपूरात केलेल्या कारवाईत तब्बल 46 किलो गांजासह साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. या कारवाईतून जिल्ह्यात कोविडच्या भयातही अवैध धंदेवाईकांचा कारनामे सुरुच असल्याचेही समोर आले आहे.
याबाबत श्रीरामपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (ता.21) पहाटे श्रीरामपूरातील देवकर वस्ती परिसरात गांजाचा पुरवठा होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप व पोलीस पथकासह तेथे छापा घातला. यावेळी परिसरात एक बोलेरो वाहन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निरीक्षण नोंदविल्यानंतर पोलिसांनी वाहनचालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खोक्यांमध्ये निळ्या पिशव्यात दडवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील गांजा आढळून आला.
या प्रकरणी सदर वाहनाचा चालक गणेश भास्कर सरोदे (वय 38, रा.देवकर वस्ती, वॉर्ड नं.7) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा 46 किलो गांजा व 4 लाख रुपये किंमतीचे बोलेरो वाहन असा एकूण 8 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या वृत्ताने जिल्ह्यात ‘कठोर निर्बंधातही’ अवैध मालाचा पुरवठा सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईने जिल्ह्यातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताच्या चौकशीतून आणखी काय काय समोर येते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
श्रीरामपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, पो.हे.कॉ.जोसेफ साळवी, पो.ना.करमल, पो.कॉ.पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव व सुनील दिघे आदींचा या कारवाईत सहभाग होता.