यंत्रणेचा हलगर्जीपणा ठरतोय ग्रामीणभागातील वाढत्या संक्रमणाला कारणीभूत! एकीकडे शहरी रुग्णगतीला ओहोटी, तर दुसरीकडे तालुक्यात दीडशे रुग्ण दररोज येताहेत समोर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड परतल्याचे परस्पर समजून फेब्रुवारीच्या मध्यात शासकीय आदेशांची पायमल्ली करुन धुमधडाक्यात साजर्या झालेल्या अनेक विवाह सोहळ्यांनी जिल्ह्यातील कोविडची स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक अवस्थेत पोहोचवली आहे. त्याचा फटका संगमनेरसारख्या संपन्न असलेल्या तालुक्यालाही बसला आहे. गेल्या कालावधीत निर्बंध झुगारुन ग्रामीणभागात झालेल्या अनेक सोहळ्यांनी कोविडला एकप्रकारे आवतणं धाडलं आणि त्याचा परिणाम आज आपण सगळेच बघतो आहोत. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर असो वा तालुक्याच्या ग्रामीणभागातील मोठ्या लोकवस्तीची गावे तेथील स्मशानातून दररोज कोणातरी कोविड बाधिताच्या चितेच्या ज्वाळा धगधगत असल्याचे भयंकर चित्र गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या चुकांचा परिणाम दाखवित आहेत. अशा भयावह स्थितीतही ज्यांच्यावर संक्रमण आटोक्यात आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांच्याकडून पुन्हा त्याच चुका होत असल्याचे चित्र दिसत आहे. यंत्रणेतील काही जणांचा हा हलगर्जीपणा मात्र सामान्यांच्या जीवावर उठल्याचे विदारक दृष्य सध्या संपूर्ण संगमनेर तालुक्यात बघायला मिळत आहे.
नववर्षाच्या सुरुवातीला संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणात मोठी घट होवून तालुक्याची सरासरी 9.71 रुग्ण दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात खालावली. राज्यातील अन्य जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्याचा परिणाम शासन, प्रशासन आणि नागरिकांना कोविडचा विसर पडण्यात झाला. त्यातच संक्रमणाची गती अगदीच नगण्य झाल्याने शासनाने तडकाफडकी तालुकानिहाय कोविड आरोग्य केंद्रांना टाळे ठोकले. त्यामुळे कोविड गेला या चर्चेवर एकप्रकारे सरकारी मोहोरच उमटवली गेली. त्याच दरम्यान राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा धुराळा उडाळा. आता सरकारच जर असे वागणार असेल तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करणार? त्यामुळे नागरिकांनीही दोनशे जणांच्या उपस्थितीची परवानगी मिळवून हजार, दोन हजारांच्या उपस्थितीत आपल्या पाल्यांच्या लग्नाचे बार उडविण्यास सुरुवात केली.
त्यामुळे जानेवारीत सरासरी 9.71 रुग्णगतीवर आलेल्या संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण एकाच महिन्यात सरासरी 17.68 वर गेले. फेब्रुवारीत तर कोणाच्या लग्नाला किती पाहुणे अशी जणू स्पर्धाच लागल्याचेही चित्र दिसले. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसणारच हे निश्चितच होते आणि झालेही तसेच. फेब्रुवारीतील विवाह सोहळ्यांनी तालुक्याला पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या दरीत ढकलले आणि मार्चमध्ये केवळ तालुक्यातच नव्हेतर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातच कोविडचा उद्रेक झाला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोविडचा संसर्ग सर्वाधीक भरात होता, त्या महिन्यात सरासरी 51 या रुग्णगतीने तालुक्यात वर्षभरातील उच्चांकी 1 हजार 529 रुग्णांची भर पडली. त्यानंतर मात्र संक्रमणाला ओहोटी लागली आणि डिसेंबर येता येता जिल्ह्यासह तालुक्याची स्थिती समाधानकारक बनली.
मात्र फेब्रुवारीत यंत्रणेसह नागरिकांचे कोविडकडे झालेले दुर्लक्ष उफाळून आले आणि मार्चमध्ये पुन्हा एकदा तालुक्याची अवस्था अनियंत्रित झाली. या एकाच महिन्यात बाराही महिन्यातील सर्व उच्चांक मोडीत निघाले आणि सरासरी 62 रुग्ण दररोज या गतीने तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत उच्चांकी 1 हजार 919 रुग्णांची नोंद झाली. या एकाच महिन्याने शहरातील सरसरीही 22.38 वर जावून 694 रुग्ण तर ग्रामीणभागातील सरासरी 39.52 वर जावून 1 हजार 225 रुग्णांची नव्याने भर पडली. या आकडेवारीतून ग्रामीणभागात नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्रही अगदी सुस्पष्ट झाले आणि त्यातून पुढील धोकाही दिसू लागला. मात्र वर्षभर कोविडच्या मागे धावणार्या प्रशासनाला ‘रुटीन’ झाल्याने त्याची जाणीवच झाली नाही.
त्याचे दुष्परिणाम एपिलमध्ये समोर येवू लागले आणि गेल्या केवळ 19 दिवसांतच संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी तब्बल 187 रुग्ण या गतीने तालुक्यात 3 हजार 548 रुग्णांची भर पडली. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत गेल्या 19 दिवसांचा विचार करता शहरातून सरासरी 36.53 रुग्ण या गतीने केवळ 694 तर एकट्या ग्रामीणभागात सरासरी 150 रुग्ण दररोज इतक्या प्रचंड गतीने 2 हजार 854 रुग्णांची भर पडली. ही गती आजही टिकून असून त्यात वाढच होत आहे हे अतिशय चिंताजनक आहे. फेब्रुवारीत संक्रमणाचा वेग वाढल्यानंतर शासनाने रुग्ण आणि रुग्णांचा संपर्क शोधण्यासह बाधितांना रुग्णालयापर्यंत नेण्याची पद्धत पुन्हा सुरु केली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, ग्राम सुरक्षा समित्यांना अॅलर्ट करण्यात आले, मात्र यासर्व गोष्टी केवळ कागदांवरच राहील्याने पहिल्या संक्रमणातील 10 महिन्यातील एकूण रुग्णसंख्या एकीकडे आणि मागील अवघ्या चार महिन्यातील रुग्णसंख्या एकीकडे असे भयंकर चित्र निर्माण झाले.
संगमनेर नगर पालिका रुग्णांचे संपर्क शोधीत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर दैनिक नायकने त्यावर वस्तुनिष्ठ वार्तांकन केले. त्यानंतर पालिका प्रशासन जागले आणि शहरातील रुग्णांचे संपर्क शोधण्यासह रुग्ण, त्याच्याशी संबंध आलेल्या व्यक्तिंना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची प्रक्रीया सुरु झाली. त्याचा परिणाम लागण होवूनही ‘शून्य’ स्कोर असलेल्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचा गावभर बोकाळत फिरण्याचा उद्योग थांबला आणि गतीमान झालेली शहरी सरासरी पुन्हा आवाक्यात आली. मात्र ग्रामीणभागात अशी जबाबदारी सोपविलेल्या व्यक्ति व संस्था केवळ थातूरमातूर करण्यातच मश्गुल असल्याने त्याचे दुष्परिणाम ग्रामीणक्षेत्राला भोगावे लागत आहेत.
संगमनेर तालुक्यातील 172 गावांमध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचे नातेवाईक व संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा शोध घेवून त्यांची कोविड चाचणी करणे आणि त्यांना ठरवून दिलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, कामगार पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा समितीवर सोपविली गेली. मात्र आपले हितसंबंध सांभाळण्याच्या नादात यासर्वच घटकांनी या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने आज तालुक्याचा जवळपास संपूर्ण ग्रामीणभाग कोविडच्या विळख्यात अडकला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेल्या प्रत्येकाच्या मनातील कर्तव्य जागे होण्याची गरज आहे. अन्यथा देश तिसर्या कोविड संक्रमणाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असून त्याचा प्रचंड परिणाम सोसण्याची वेळ आपल्यावर येवू शकते.
एखाद्या गावात संक्रमित रुग्ण समोर आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या किमान 20 जणांचा शोध घेवून त्यांची कोविड चाचणी करुन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करावे असा शासनाचा आदेश आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे असे शासनाने सांगीतले आहे. सुरुवातीला संगमनेर नगरपालिकेला याचा विसर पडल्याने शहरी रुग्णसंख्या वाढत होती, मात्र दैनिक नायकने याबाबत लक्ष्य वेधल्यानंतर पालिकेने आपली जबाबदारी स्विकारली, त्याचे सकारात्मक परिणाम आज आपण पहातोय. मात्र त्याचवेळी ग्रामीणभागातील यंत्रणांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्याने कोविडचा उन्माद अजूनही भरात असून तालुक्यातील ग्रामीणभागाची स्थिती चिंताजनक अवस्थेत पोहोचली आहे.