मी फक्त पारनेरचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार ः लंके आंबीखालसा येथील रक्तदान शिबिरास आमदार नीलेश लंकेंची सदिच्छा भेट
नायक वृत्तसेवा, घारगाव
कोरोनाच्या भयावह संकटात कोणताही विचार न करता रुग्णांसाठी अहोरात्र काम करत आहे. परमेश्वरही पाठिशी खंबीरपणे उभा असल्याने जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभत आहे. त्यामुळे मी अनेकांना सांगतो की, मी फक्त पारनेरचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथे गुरुवारी (ता.10) असलेल्या शनैश्वर जयंतीचे औचित्य साधून श्री शनैश्वर हनुमान तरुण मित्रमंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यानिमित्त संध्याकाळी आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते श्री शनैश्वर महाराजांची आरती करण्यात आली. त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपसरपंच सुरेश कान्होरे, आंबी माळेगाव सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ कहाणे, नंदू कान्होरे, श्रीधर कहाणे, चेतन कहाणे, अविनाश भोर, अमोल थोरात, वेदांत कहाणे, गणेश कहाणे, अक्षय कान्होरे, सोमनाथ ढमढेरे, दत्ता ढमढेरे, महेश पानसरे, मंगेश सूर्यवंशी, एकनाथ बर्डे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार लंके म्हणाले, एखादा कार्यक्रम म्हटला की तरुण डीजे लावतात. मात्र आंबीखालसा येथील श्री शनैश्वर हनुमान मित्रमंडळाच्या तरुणांनी असे न करता सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केले. त्या माध्यमातून सुमारे 55 दात्यांनी रक्तदान केले. त्यामुळे खर्या अर्थाने तरुणांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाबद्दल किती प्रेम आहे हे या उपक्रमातून दाखवून दिले आहे. आज कोरोना काळात मी कुठलाच विचार केला नाही. केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी काम करत राहिलो असून परमेश्वर आपल्या पाठिशी खंबीरपणे आहे. प्रत्येक माणूस वाचला पाहिजे त्यासाठी आपण काम करत आहोत. कोणता आमदार कोविड सेंटरमध्ये झोपेल का? पण मी कोविड सेंटरमध्ये झोपतो. जिवावर उदार होऊन आपण काम करत आहोत. याकाळात कधीही दुजाभाव केला नाही. फक्त त्या रुग्णाचा जीव वाचावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहे. भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड आरोग्य मंदिरात कर्नाटक, धुळे, पुणे आदी भागांतून रुग्ण दाखल होते. ते सर्व बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे मी अनेकांना सांगतो की मी महाराष्ट्राचा आमदार आहे, असे आमदार लंके यांनी शेवटी नमूद केले.
दरम्यान, सकाळी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रशीद सय्यद, यांसह मान्यवर उपस्थित होते. तरुणांनी कोविडच्या संकटात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविल्याने त्यांचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.