राजूर-पाचनई रस्त्याचे निकृष्ट काम
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू असलेले राजूर ते पाचनई रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने चालू आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, दर्जेदार काम करण्याची मागणी केली आहे.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ.किरण लाहमटे यांनी या रस्त्यांच्या कामांसाठी भरपूर निधी मंजूर करून आणला आहे. मात्र. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. सध्या राजूर ते पाचनई रस्त्याचे काम सुरू असून, राजूर ते हिलेदेव फाटा मार्गे परिसरातील 30 ते 35 गावांतील नागरिक प्रवास करतात. या रस्त्याचे अतिशय निकृष्ट काम झाल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहे. साधे मुरुमाने कठडेही बुजविले नसल्याने वाहनचालक घसरुन पडत आहे. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.