शहर पोलिसांचा अवैध कत्तलखान्यांवर छापा 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; दोघांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या भयावह संकटातही शहरात अवैध कत्तलखाने सुरूच असल्याचे समोर आले आहे. जमजमनगर वसाहतीत टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी सोळाशे किलो वजनाचे गोमांस आणि आठ गोवंश जनावरे असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जमजगनगर येथे अवैधरित्या गोमांसाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन रविवारी (ता.18) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारस टाकलेल्या छाप्यात सोळाशे किलो वजनाचे 3 लाख 20 हजार रुपयांचे गोमांस मिळून आले. सदर विक्री करणारा कसाई रफीक खान हा पोलिसांना पाहून पळून गेला. तर दुसरी कारवाई येथेच करण्यात आली असून, 40 हजार रुपये किंमतीचे आठ गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने काटवनात बांधून ठेवल्याचे आढळून आले. सदर दोन्ही कारवाई प्रकरणी पोलीस शिपाई अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रफीक खान (पूर्ण नाव माहीत नाही) आणि रियाज अहमद अब्दुल रहीम शेख (रा.निंबाळे) यांच्याविरुद्ध गुरनं.208 व 211/2021 भादंवि कलम 269/429 म.प्रा.स.का.क. 5(क)9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लबडे हे करत आहे.
