पुण्यातील आरोपीकडून पठारावरील अल्पवयीन मुलीचा विनयभंग! पोक्सोसह अॅट्रोसिटीचा गुन्हा; घारगाव पोलिसांनी पुण्यात आवळल्या आरोपीच्या मुसक्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्यानंतर त्याचे चांगले व वाईट परिणाम समोर येतातच हे गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत वेळोवेळी समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्याच्या पठारभागातूनही समोर आला आहे. साकूर परिसरातील अवघ्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी मोबाईलवरुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका आरोपीने थेट पुण्यातून त्या विद्यार्थिनीची शाळा गाठली. यावेळी मधल्या सुट्टीत शाळेबाहेर असलेल्या ‘त्या’ मुलीचा हात धरुन त्याने तिला सोबत नेण्याचाही प्रकार केला. या झटपटीत त्या मुलीचे कपडेही ओढले गेले आणि लज्जा उत्पन्न होणारे कृत्यही घडले. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेची फिर्याद शुक्रवारी दुपारी दाखल होताच घारगाव पोलिसांनी थेट पुण्यात जावून आरोपीला उचलले, आज त्याला न्यायलयासमोर हजर केले जाणार आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पठारभागातील साकूर परिसरात राहणार्या एका अवघ्या तेरावर्षीय मुलीची गेल्या वर्षी पुण्यातील अरुण शिवाजी पांचाळ या तरुणाशी मोबाईलवर ओळख झाली. त्यानंतर आरोपी पांचाळ नेहमी त्या मुलीला मोबाईलवर फोन करुन तिच्याशी संवाद करीत असत व इतरवेळी वेगवेगळे संदेश पाठवून तिच्या संपर्कात राहण्याचाही प्रयत्न करीत. मात्र मध्यंतरीच्या काळात सदर विद्यार्थिनीने आरोपीशी असलेला संवाद खंडित केला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आरोपीने चक्क पीडित मुलीच्या वडिलांना फोन करीत त्यांनाच दमबाजी केली.

यावरही न थांबता आरोपीने गुरुवारी (ता.2) थेट पुण्याहून साकूरला येवून ती विद्यार्थिनी शिकत असलेली शाळा गाठली. यावेळी शाळेची मधली सुट्टी झालेली असल्याने सर्व विद्यार्थी शाळेच्या परिसरातच वावरत होते. त्याचवेळी पीडित मुलगी खाऊ घेण्यासाठी शाळेसमोरील एका दुकानात गेली असता आरोपी अरुण पांचाळ याने तेथे जावून बळजोरीने तिचा हात पकडला व तिला आपल्याकडे ओढीज ‘माझ्यासोबत चल’ असे म्हणू लागला. त्याच्या तावडीतून सुटका करुन घेताना त्या मुलीचे कपडेही ओढले गेले. यावेळी सदरील तरुणाने अश्लील कृत्यही केले.

हा प्रकार सुरु असताना आसपासच्या नागरिकांना काहीतरी विपरित घडत असल्याचा अंदाज आल्याने त्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली, त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला. पीडितेने सदरची घटना घरी सांगितल्यानंतर शुक्रवारी (ता.3) दुपारी तिच्या पालकांनी तिच्यासह घारगाव पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार कथन करीत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अरुण शिवाजी पांचाळ (रा.पुणे) याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 8 अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस तपासात आरोपीचा माग लागल्यानंतर घारगाव पोलिसांच्या पथकाने थेट पुण्यात जावून शुक्रवारी रात्री त्याला उचलले व घारगावात आणून त्याला अटक केली आहे. आज त्याला संगमनेरच्या न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या घटनेने साकूरसह संपूर्ण पठारभागात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहेत.

