एसएमबीटी ट्रस्टकडून ग्रामीण रुग्णालयास पाच बायपॅप मशीन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडी येथील कोरोना सेंटरमध्ये थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी शुक्रवारी पाहणी केली असून, तेथील डॉक्टरांच्या मागणीनुसार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टने तातडीने कृत्रिम श्वासासाठीचे 5 बायपॅप मशीन उपलब्ध करून दिले. तर नव्याने ऑक्सिजनचे 40 बेड सुरू करण्यात आले आहेत.

घुलेवाडी येथील कोरोना सेंटरमधील आयसीयूला इंद्रजीत थोरात यांनी भेट देऊन डॉक्टर व रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी तेथील डॉक्टरांनी तातडीने 5 बायपॅप मशीन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. यानुसार एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टने कृत्रिम श्वासोश्वाससाठी पाच बायपॅप मशीन तातडीने दिले आहेत. ते डॉक्टरांच्या मदतीने तत्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुकास्तरावर सर्वप्रथम आरटीपीसीआर मशीनही घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिले आहे. याचबरोबर नव्याने ऑक्सिजनचे चाळीस बेडही वाढविण्यात आले असून आता बेडची एकूण संख्या शंभर झाली आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया, यशोधन कार्यालयाचे आरोग्य विभाग प्रमुख महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.
