अगस्ति आश्रमातील भक्त निवासात दीडशे खाटांचे कोविड सेंटर सुरू आमदार डॉ.किरण लहामटेंच्या हस्ते उद्घाटन; दानशूर करणार मदत
नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति आश्रमातील भक्त निवासात 150 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी (ता.16) आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर व तहसीलदार मुकेश कांबळे उपस्थित होते.
अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत असणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे भक्त निवासातील खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या खानापूर येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर असून त्यात 14 ऑक्सिजन बेड होते. त्यात वाढ करून 30 ऑक्सिजन बेड करण्यात आले आहेत. तालुक्यातील राजूर, कोतूळ व समशेरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 30 बेडचे कोविड केअर सेंटर आहेत. राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रयत्नातून आदिवासी मुले-मुलींच्या वसतिगृहात पुरुष व स्त्रियांसाठी प्रत्येकी 50 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. तर अकोले शहरात दोन खासगी डेडीकेटेड कोविड सेंटर आहेत.
अगस्ति आश्रमातील कोविड केअर सेंटरसाठी प्रशासन, अगस्ति साखर कारखाना, स्वयंसेवी संस्था व संघटना तसेच दानशूर व्यक्ती यांनी हातभार लावला आहे. नाश्ता व जेवणाचा खर्च प्रशासन करणार आहे तर इतर सुविधा अगस्ति कारखाना, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती उचलणार आहेत. याप्रसंगी अगस्ति देवस्थानचे अध्यक्ष अॅड.के.डी.धुमाळ, बाजार समितीचे सभापती पर्बत नाईकवाडी, अगस्तिचे संचालक रामनाथ वाकचौरे, अशोक देशमुख, अशोक आरोटे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, मीनानाथ पांडे, प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर, अमित नाईकवाडी, सचिन पवार, हरीदास माने आदी उपस्थित होते.