औषधांचा काळाबाजार जोमात असूनही ‘अन्न व औषध’ विभागाची मुगगिळी! प्रशासन फक्त ‘ऑल इज वेल’ म्हणण्यातच धन्य; रेमडेसिवीरसाठी मोजावे लागतात चौपट पैसे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दिड महिन्यांहून अधिक कालावधीपासून राज्यासह जिल्ह्यात कोविड प्रचंड वेगाने पसरतोय. गेल्यावर्षी प्रादुर्भाव सुरु झाला त्यावेळी संसर्ग होवून लक्षणे समोर येण्याचा कालावधी सात दिवसांचा होता. आता समोर आलेल्या नव्या संशोधनानुसार हाच कालावधी वाढून चौदा दिवसांचा झाल्याचे निरीक्षण आंतरराष्ट्रीय पातळीवरुन समोर आले आहे. त्यामुळे काळजीसोबतच चिंताही वाढल्या आहेत. त्यातच रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर लसीचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असून 900 रुपयांची लस तब्बल 10 ते 15 हजारांना विकली जात आहे. त्यातच जिल्ह्यानंतर सर्वाधीक आरोग्य सुविधा असलेल्या संगमनेरातील 28 डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये आजच्या स्थितीत केवळ 9 अतिदक्षता विभागात व 33 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा शिल्लक आहेत. औषधांच्या काळाबाजाराने अवघा जिल्हा त्राही त्राही करीत असतांनाही जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाची ‘मूगगिळी’ भूमिका संशय निर्माण करीत असून हा विभाग मढ्याच्या टाळूवरचेही सोडीत नसल्याचा संताप जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या नातेवाईकांमधून व्यक्त होवू लागला आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील आरोग्य यंत्रणा तणावाखाली आल्या आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीर या कोविड रुग्णांना संजीवनी ठरलेल्या लशीचा जिल्ह्यात प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना एक लस मिळवण्यासाठी अक्षरशः विनवण्या करण्याची वेळ आली आहे. राज्यातील औषधांच्या साठेखोरांनी या लसीची कृत्रिम टंचाई निर्माण करुन 5 हजार 400 रुपये छापील किंमत असलेल्या व शासनाने अवघ्या 900 ते 1200 रुपयांना उपलब्ध करुन दिलेल्या या लशीची विक्री आता चक्क 10 ते 15 हजार रुपयांना केली जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनांशी सुरु असलेला हा खेळ सामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण करणारा आहे.

औषधांसह आता कोविडची लागण होवून गंभिर झालेल्या रुग्णाच्या उपचारांचीही समस्या उभी राहु पहात असून रोजची वाढती रुग्णसंख्या आणि सक्रीय रुग्णांमध्ये पडणारी रोजची भर यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही आता ‘व्हेंटीलेटरवर’ येण्यासारखी स्थिती आहे. एकट्या संगमनेर तालुक्याचा विचार करता आजच्या (ता.12) स्थितीत संगमनेर तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 225 आहे. संगमनेर तालुक्यातील 28 खासगी रुग्णालयांना कोविडवरील उपचारांची परवानग देण्यात आलेली असून यासर्व ठिकाणी मिळून 879 रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. त्यात अतिदक्षता विभागात 138, ऑक्सिजनची सुविधा असलेले 293, व्हेंटीलेटरची सुविधा असलेले 38 आणि सामान्य 211 अशी व्यवस्था आहे. मात्र वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही वाढल्याने आजच्या स्थितीत तालुक्यात केवळ अतिदक्षता विभागात 9 व ऑक्सिजनची सुविधा असलेल्या 33 खाटांसह सामान्य कोविड बाधितांसाठी 69 खाटा उपलब्ध आहे. ही स्थिती अत्यंत चिंतादायक आहे.

संगमनेर तालुक्यातील 28 खासगी रुग्णालयांपैकी कानवडे हॉस्पिटलमध्ये (अकोले नाका) ऑक्सिजनची सुविधा असलेले आठ तर सामान्य 10, वृंदावन हॉस्पिटलमध्ये (चंदनापुरी घाट) अतिदक्षता विभाग व ऑक्सिजनची सुविधा असलेल्या प्रत्येकी पाच व सामान्य पंधरा, सुयश हॉस्पिटलमध्ये (ताजणे मळा) अतिदक्षता व ऑक्सिजन सुविधा असलेल्या प्रत्येकी एक व सामान्य तीन, घुलेवाडी येथील गुरुप्रसाद रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा असलेल्या चार व सामान्य 19, पोफळे हॉस्पिटलमध्ये सामान्य एक, सिद्धकला हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात एक व ऑक्सिजन सुविधा असलेल्या चार खाटांसह सामान्य रुग्णांसाठी चार खाटा, सत्यम रुग्णालय (ताजणे मळा) येथे ऑक्सिजन सुविधा असलेल्या दोन व सामान्य दोन, रंगारगल्लीतील पसायदान रुग्णालयात सामान्य दोन, वडगाव पान येथील शिंदे रुग्णालयात सामान्य तीन, इंदिरानगर मधील ताम्हाणे रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा असलेल्या चार व सामान्य एक व नवीन नगर रस्त्यावरील निघुते हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील दोन, ऑक्सिजन सुविधा असलेल्या सात व सामान्य नऊ खाटा शिल्लक आहेत. शहरात आजच्या स्थितीत 38 पैकी एकही ठिकाणी व्हेंटीलेटर सुविधा शिल्लक नाही.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले वारंवार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे दौरे करुन कोविड स्थिती आणि उपाययोजना यांचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी एकप्रकारे एकाकी लढा देत आहेत. मात्र त्याचवेळी राज्य सरकारने वेळोवेळी कोणताही तुटवडा नसल्याचे सांगूनही जिल्ह्यात रेमडेसिवीर लस उपलब्ध होत नसूनही त्यावर थेट नियंत्रण असलेला ‘अन्न व औषध’ विभाग अजूनही अजगराप्रमाणे सुस्त होवून बसला आहे. त्याचा हा विळखा सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असून अवघ्या 900 ते 1200 रुपयांना मिळणार्या एका लसीसाठी साठेबाजांना तब्बल 10 ते 15 हजार रुपये मोजण्याची वेळ गंभिर अवस्थेत उपचार घेणार्या कोविड बाधितांच्या नातेवाईकांवर आली आहे. तीन मंत्री आणि एक पालकमंत्री लाभलेल्या जिल्ह्यातील ‘अन्न व औषध’ विभागाची ही मुगगिळी संतापजनक असून हा प्रकार म्हणजे ‘मढ्याच्या टाळूवरचे’ खाण्याचाच प्रकार असल्याचे मानून जिल्ह्यातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या विभागातील अधिकारी आणीबाणीच्या या काळात नेमकी काय करीत आहे? याचा शोध लागणं आवश्यक आहे. अन्यथा या विभागाच्या विरोधातील आक्रोश आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रचंड क्रियाशिल झाले असून दररोज दोन-तीन तालुक्यांना भेटी देवून तेथील यंत्रणांना सजग करण्याचे काम करीत आहेत. या दरम्यान त्यांनी वारंवार औषधांचा व लशीचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगीतले आहे. असे असतांनाही रुग्णांच्या नातेवाईकांना कोविडवरील औषधांसाठी व रेमडेसिवीर लशीसाठी धावाधाव करावी लागत असूनही जिल्ह्यातील ‘अन्न व औषध’ विभागाने जिल्ह्यातील एकाही साठेबाजावर अथवा काळा बाजार करणार्यावर कारवाई केल्याचे अथवा औषधांचा साठा हस्तगत करण्यासाठी छापेमारी केल्याचे एकही उदाहरण समोर आलेले नाही. यावरुन या विभागाचे औषधांचा काळाबाजार करणार्यांशी थेट साटेलोटे असल्याचा संशय घेण्यास पूर्ण वाव असून जिल्हाधिकार्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतूदींचा वापर करुन या अशा अधिकार्यांची चौकशी करुन त्यांना बडतर्फ करण्याची कारवाई करावी अशी संतप्त मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहे.

