साधुंना मारहाण खरोखरी जातीय भावनेतूनच झालीये का? नागरीकांमधली राजकीय चर्चा; पोलिसांकडून दोघांना अटक व सुटका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रविवारी निंभाळे चौफुलीजवळ कट मारल्याचा जाब विचारला गेल्याने एका तरुणाने बापलेकीला मारहाण करण्याच्या घटनेला हिंदू-मुस्लिम रंग चढला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यात घडलेला हा प्रकार राजकीय मंचावर आला. आंदोलने झाली, राजकीय लाभ मिळवण्यासाठी बायपास मार्गावर ठिय्या देत तासन् तास सामान्य वाहतूकदारांची कोंडीही केली गेली. पोलिसांनी धावपळ करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यातून बाहेर पडून शहर पुन्हा रुळावर येत असतानाच सोमवारी दोघा बिनडोक तरुणांनी रस्त्याने जाणार्या तीन-चार साधुंच्या जथ्याला अडवले आणि नाहक मारहाण केली. यावेळी मारहाण करणार्यांकडून ‘इथे गांजा कशाला ओढता..’ असं काहीतरी वारंवार विचारलं जातं असल्याचेही दिसून आले. हा प्रकार सुरु असताना कोणीतरी दुचाकीस्वाराने काही अंतरावर थांबून या घटनेचे चित्रण केले आणि सोशल माध्यमाच्या प्रवाहात त्याची होडी करुन सोडले. काही वेळातच ही घटना वार्यासारखी पसरली आणि त्यालाही जातीय रंग चढला. इथेही पोलिसांनी धावपळ करीत ‘व्हायरल’ व्हिडिओवरुन आरोपींचा माग काढीत दोन भीन्न धर्माच्या आरोपींची ओळख पटवली आणि या प्रकरणाचे वळण थांबवले. या दोन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांना एकाच दिशेला नेण्याचा प्रयत्न मात्र सारखाच असल्याने या घटनेमागील नेमके सत्य जाणून घेण्याची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पोलिसांनी मंगळवारी दोन्ही आरोपींना अटक करुन नेमक्या वास्तवाचा शोधही घेतला आहे.
सोमवारी (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास बबन देवराम जाधव (वय 70, रा.देहरे, ता.अहिल्यानगर), कैलास रंगनाथ शिंदे (वय 68, रा.रामवाडी, अहिल्यानगर), विलास मारुती वडागळे (वय 48) व मल्हारी दादू चांदणे (रा.रामवाडी, अहिल्यानगर) हे चौघे जठार हॉस्पिटलजवळील रस्त्याने बसस्थानकाकडे जाण्यास निघाले होते. जठार हॉस्पिटलपासून काही अंतरावर आल्यानंतर अचानक या चौघांसमोर दोन तरुण येवून उभे राहीले आणि त्यांच्याशी वादावादी करु लागले. काही क्षणातच त्या रस्त्याने जाणार्या एका दुचाकीस्वाराने आपले वाहन उभे करुन या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले. त्या चित्रणात दमदाटी करणारे ‘ते’ दोघे तरुण ‘इथे गांजा कशाला ओढता..’ असं काहीतरी म्हणतं म्हणतंच त्यांच्याशी बोलताहेत असा आवाज येतो. यावेळी चौघाही साधुंकडून ‘गांजा ओढत नसल्याचे’ सांगितले जात असल्याचेही ऐकू येते.
त्यानंतर त्या तरुणांकडून त्या साधुंना चापटीने मारहाण सुरु होते आणि ते चौघेही साधू आरडाओरड करीत तेथून पळायला सुरुवात करतात. यावेळी आसपासचे काहीजण ‘एऽ अरे का मारतायं, काय झालंय..’ अशी विचारणा करतानाही आवाज येतो. मात्र या सगळ्या गोष्टींकडे ‘अफवा’ पसरवणार्यांनी दुर्लक्ष केले आणि मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होवून संगमनेरच्या वातावरणात पुन्हा तणावाचा ताप चढवला गेला. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तासाभरातच व्हायरल व्हिडिओवरुन दोघाही तरुणांची ओळख पटवून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली. त्यातील एका आरोपीचे नाव अजय बबन साळवे (वय 20, रा.माताडे मळा, सुकेवाडी रोड) व दुसर्याचे नय्युम सुल्तान शेख (वय 21, रा.श्रमिकनगर) अशी असल्याचेही उघड झाले.
घटनास्थळापासून लांब आणि त्यातही हिंदू लोकवस्ती व वर्दळ असलेल्या ठिकाणी या दोघांनी चौघा हिंदूंना आणि त्यातही संन्याशांना मारहाण करण्याचा प्रकार पोलिसांनाही धक्कादायकच वाटल्याने त्यांनी आरोपींच्या शोधासाठी जंग पछाडली आणि अखेर मंगळवारी (ता.12) दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून घटनेच्यावेळी दोघेही मद्याच्या नशेत तर्राट असल्याचे समोर आले. समोरुन येणार्या साधुंना पाहुन त्यांच्याकडे गांजा मिळेल या विचाराने त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. मात्र साधुंनी नकार दिल्यानंतर त्यांच्याकडे गांजा असुनही ते आपल्याला देत नाहीत अशी भावना निर्माण होवून त्या दोघांनी नशेत त्यांना चापटीने मारले.
या घटनेनंतर तासाभरातच हा प्रकार जातीय नसून वेगळ्याच कारणाने घडल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने अशा प्रकरणांना वेगळ्या वळणावर नेवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचेही प्रकार सुरु आहेत. त्यातूनच या प्रकरणालाही वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच दोन्ही आरोपींची नावे निष्पन्न करण्यासह साधु आणि आरोपी यांच्या चौकशीतून हा सगळाप्रकार व्यसनासाठी झाल्याचे सत्य समोर आणले. यावरुन संगमनेरात राजकारणही रंगले होते. शिवसेनेच्या उबाठा गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी पत्रकाद्वारे काही शक्तिंचा उल्लेख करीत राजकारणासाठी हा वाद निर्माण केला गेल्याचा आरोपही केला आहे.
संगमनेर शहरात हिंदू-मुस्लिम गुण्या-गोविंदाने नांदतात. मात्र काहीजण विनाकारण जातीय वाद निर्माण करीत आहेत. एखाद्या घटनेला जातीय रंग देवून बुद्धिभेद केला जात आहे. साधुंना मारहाण करण्याचा प्रकार निंदणीयच आहे, दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी सर्वांचीच मागणी आहे. मात्र कोणत्याही गोष्टीचे राजकारण करुन, नागरिकांमधील सौहार्द नष्ट करुन कोणी आपला स्वार्थ साधणार असतील तर सृजाण नागरिक त्याचा निश्चितच विचार करतील.
अमर कतारी
माजी शहरप्रमुख, शिवसेना (उबाठा)