लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला एका दिवसाची एसीबी कोठडी! नाशिक एसीबीची कारवाई; ठेकेदाराकडून लाच घेतांना सोमवारी झाला होता चतुर्भूज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ठेकेदारीने घेतलेले काम पूर्ण झाल्याने त्याची पाहणी करुन त्याबाबतचा अंतिम अहवाल देण्यासाठी ठेकेदाराकडून 19 हजारांची लाच घेतांना पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेला लाचखोर कनिष्ठ अभियंता संजय गोविंदराव ढवण हा सोमवारी एसीबीच्या सापळ्यात अडकला होता. रात्री उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. आज त्याला संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी एक दिवसासाठी त्याची रवानगी एसीबी कोठडीत केली आहे. संबंधित ठेकेदाराच्या तक्रारीवरुन नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली होती.

तालुक्यातील एका 26 वर्षीय ठेकेदाराने चिंचोली गुरव ग्रामपंचायत हद्दितील मुस्लिम धर्मियांच्या स्मशानभूमीची सुरक्षा भिंत बांधण्याचे व सुशोभिकरण करण्याचे 3 लाख रुपयांचे काम घेतले होते. सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने आपल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात श्रेणी तीनच्या कनिष्ठ बांधकाम अभियंता पदावर कार्यरत असलेल्या संजय गोविंदराव ढवण (वय 57, रा.श्रीरामपूर) याला भेटून झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची व त्यानुसार एम.बी करुन देण्याची त्याला विनंती केली. मात्र वारंवार हेलपाटे मारुनही आणि विनवण्या करुनही संबंधित लाचखोर खुर्चीवरुन हालायलाच तयार होत नसल्याने त्याने त्याला काम अडवून ठेवण्याबाबत विचारणा केली.

यावेळी त्या लाचखोराने पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचे सांगत कामाच्या रकमेच्या 5 टक्के म्हणजे 15 हजार रुपये आपले व 4 हजार रुपये दर्जा तपासणीस अधिकार्याचे असे एकूण 19 हजार रुपये देण्याची मागणी केली. संबंधित ठेकेदाराने सदरचे काम जीव ओतून प्रामाणिकपणे केल्याने अवघ्या तीन लाखांच्या कामातील 19 हजारांची रक्कम त्याला दिल्यास मागे काय राहणार असा विचार केला?. मात्र सदरचा लाचखोर अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामही करीत नसल्याने त्या इेकेदाराचे पैसे अडकून गेल्याने त्याचे चक्रच बिघडले होते.

त्यामुळे शेवटी त्याने सगळ्याच ठेकेदारांची आर्थिक पिळवणूक करणार्या या लाचखोराला कायमची अद्दल घडवण्याचा निश्चय केला आणि थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने यांनी पो.ना.प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी व हवालदार संतोष गांगुर्डे यांच्यासह संगमनेरच्या पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. ठरल्यानुसार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संबंधित ठेकेदाराला 19 हजारांच्या रोकडसह पंचासोबत त्या लाचखोराच्या कक्षात पाठविण्यात आले.

यावेळी संबंधित ठेकेदाराने एसीबीने विशिष्ट पावडर लावलेली 19 हजारांची रक्कम स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला चतुर्भूज केले. यावेळी त्या लाचखोराने त्यांच्या तावडीतून सुटून जाण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही. या कारवाईची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एसीबीने त्याला ताब्यात घेत शासकीय विश्रामगृहावर आणले. तेथे दीर्घकाळ त्याची चौकशी केल्यानंतर रात्री उशिराने त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला कारागृहात टाकण्यात आले.

आज (ता.24) दुपारी त्याला संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसीबीच्या वतीने बाजू मांडतांना सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करतांना आरोपी लोकसेवकावरील कारवाई दरम्यान हजर असलेल्या साक्षीदारांचे जवाब नोंदविणे बाकी असल्याचे सांगत संबंधित लोकसेवकाने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन किती संपत्ती जमा केली आहे याचाही शोध घ्यायचा असल्याने त्याच्या एसीबी कोठडीची मागणी केली. त्यावर जिल्हा न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली. उद्या त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

