सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे ‘राष्ट्रवादी’त! राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून करणार काम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण आता पेटताना दिसत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या राजकीय नेत्यांचे इन्कमिंग सुरू झाले आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर आणि तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी नेत्यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागामध्ये काम करण्याची इच्छा मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली होती. त्यावर बुधवारची (ता.4) ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी बुधवारी पुण्यात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. तर लवकरच हे दोघेही कलावंत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची धुरा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तमाशा कलावंत यांच्यासाठी वेळोवेळी हे दोन्ही कलावंत धावून जातात. राष्ट्रवादी सांस्कृतिकच्या माध्यमातून तमाशा कलावंतांसाठी यापेक्षाही मोठे काम ते दोघेही इथून पुढे करणार आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीररीत्या प्रवेश होईल अशी माहिती यावेळी बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे यांचा बुधवारी प्राथमिक स्वरूपात प्रवेश करून घेण्यात आला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, पुणे जिल्हाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष शशीकांत कोठावळे, राज्य समन्वयक संतोष साखरे, प्रदेश सरचिटणीस मंगेश मोरे हे यावेळी उपस्थित होते.

Visits: 222 Today: 1 Total: 1791643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *