अरे देवा! नवर्‍यानेच सासर्‍याच्या ताब्यातून बायको पळवली!! धांदरफळ शिवारातील प्रकार; नवर्‍यासह सात जणांवर अपहरणाचा गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या बलाढ्य देशातून दररोज अचंबित करणार्‍या घटना समोर येत असताना त्यापासून आता संगमनेरचा ग्रामीण भागही दूर राहिलेला नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील धांदरफळ शिवारातून समोर आला असून या खळबळजनक घटनेत चक्क नवरोबानेच आपल्या कुटुंबातील अन्य लोकांच्या मदतीने आपल्या पित्याच्या दुचाकीवरुन घरी जात असलेल्या विवाहितेला अडवून तिच्या वडिलांना मारहाण केली व तिला जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ‘त्या’ विवाहितेच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या नवर्‍यासह सासू-सासरे, दीर व अन्य तिघांवर विविध कलमांसह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धांदरफळ बु. येथील जावळेमळ्यात राहणार्‍या मुलीचे कोल्हेवाडी येथील शुभम आनंदा कोल्हे याच्याशी दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र लग्नानंतर संबंधित विवाहितेने सासरच्या मंडळीवर कौंटुबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याने तेव्हापासूनच ती आपल्या वडिलांकडे धांदरफळ येथेच राहते. या दरम्यानच्या कालावधीत तिने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणीही सुरु असल्याने त्यासाठी ती नियमितपणे आपल्या वडिलांसह न्यायालयात हजर राहते. त्यानुसार गेल्या शनिवारी (ता.२१) सदरील विवाहिता आपल्या वडिलांसह संगमनेरच्या कौटुंबिक न्यायालयात हजर होती.

न्यायालयीन कामकाज उरकल्यानंतर ते दोघेही दुचाकीवरुन धांदरफळकडे जात असताना डेरेवाडी फाट्याजवळ एका बोलेरो जीपने त्यांना रोखले. यावेळी बोलेरोमधून उतरलेला ‘त्या’ विवाहितेचा पती शुभम आनंदा कोल्हे याच्यासह त्याचे वडील आनंदा महादू कोल्हे, भाऊ ऋतीक, आई आणि अन्य तिघांनी त्यांना शिवीगाळ करीत विवाहितेच्या पित्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे ते दुचाकीवरुन रस्त्यावर खाली पडले. त्याचा गैरफायदा घेत त्या सर्वांनी बळजोरीने त्यांच्या मुलीला सोबत आणलेल्या बोलेरो जीपमध्ये घालून तिचे अपहरण केले.

याप्रकरणी विवाहितेच्या पित्याने तालुका पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोल्हेवाडीतील सात जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम ३४१, ३६३, ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आपल्याच बायकोला चक्क तिच्या पित्याच्या ताब्यातून पळवून नेण्याचा हा प्रकार तालुक्याला बहुधा पहिल्यांदाच ऐकायला मिळाल्याने या प्रकरणाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

कौटुबिक हिंसाचाराच्या तक्रारीवरुन एकमेकांपासून विभक्त होण्यासाठी संबंधित विवाहितेने न्यायालयीन पायरी ओलांडलेली असताना चक्क तिलाच नवर्‍याकडून पळवून नेण्याचा प्रकार पोलिसांसाठीही अनोखा आहे. या अपहरण नाट्याला २४ तासांचा कालावधील उलटूनही पोलिसांना अद्यापही अपहरणकर्ती सासरची मंडळी व मुलीचा शोध घेता आलेला नाही. सदरील बोलेरो वाहन कोठून आले व कोठे गेले याबाबतही अजून साशंकता असून पोलीस धांदरफळ शिवारातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.

Visits: 117 Today: 1 Total: 1114719

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *