महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना कार्यपद्धतीबाबत समज द्या! महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे ज्ञानेश्वर कांदळकर यांची निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना शासन आदेश, शासकीय नियमावली, कार्यालयीन शिष्टाचार, महाराष्ट्र सेवा शास्ती वर्तवणूक अधिनियमातील तरतुदी, सेवा हमी कायदा, माहिती अधिकार कायदा, ऑफिस म्यॅनुअलमधील तरतुदींप्रमाणे अनुसरावयाची कार्यपद्धतीबाबत कडक स्पष्ट मराठी भाषेत समज देऊन या संबंधित तक्रारीबाबत आपण व्यक्तीशः सूक्ष्म लक्ष घालून दोषींवर कारवाईचे आदेश पारित करावे, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर यांनी निवेदनातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, 2 मार्चला आपल्याला वरील विषयाबाबत कार्यवाही करण्याबाबत पत्र पाठविले होते. पंरतु आजतागायत त्यावर उचित कार्यवाही झाली नाही. याबाबत तोंडी तसेच पत्रव्यवहार करुनही संबंधित अधिकारी तथा कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या पत्रावर वेळेत कार्यवाही न करण्याचे धाडस करत असतील तर सामान्य जनतेच्या कामावर तसेच तक्रारीवर हे काम करतात का? याबाबत आपण सखोल चोकशी करुन दोषींवर कारवाईचे आदेश द्यावे.
तसेच कोणत्याही कार्यालयात शासन नियमावलीप्रमाणे कोणताही कार्यालय प्रमुख, जिल्हा नोडल अधिकारी, विभागीय आयुक्त, मंत्रालयातील मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, अवर सचिव, उपसचिव कार्यालयीन शिष्टाचार, महाराष्ट्र सेवा शास्ती वर्तवणूक अधिनियमातील तरतुदी, सेवा हमी कायदा, माहिती अधिकार कायदा, ऑफिस म्यॅनुअलमधील तरतुदींप्रमाणे अनुसरावयाची कार्यपद्धतीनुसार काम करत नाही. अथवा आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करत नाही. त्यामुळे जनतेला योग्य न्याय मिळत नाही. आधीच कोरोना महामारिमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे आपण गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी कांदळकर यांनी केली आहे.
लोकप्रतिनींधीना दिलेल्या निवेदनावर, पत्रावर महसूल अधिकारी व कर्मचारी विहीत वेळेत कार्यवाही करत नसतील तर जनतेने कसा विश्वास ठेवावा. संबंधित तक्रारीवर योग्य कार्यवाही न झाल्यास संबंधित मंत्रालयातील तसेच राज्यात दोषी अधिकारी-कर्मचार्यांबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, लोकआयुक्त व उपआयुक्त यांची भेट घेणार आहे.
– ज्ञानेश्वर कांदळकर, संगमनेर