पंचवीस हजार रक्त पिशव्या संकलित करण्याचे लक्ष्य रक्ताचा प्रचंड तुटवडा असल्याने युवक काँग्रेसचा पुढाकार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाचा वाढता प्रकोप, सध्या सुरू असलेले निर्बंध आणि लसीकरण यामुळे रक्त संकलन घटले आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत असतानाच राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत युवक काँग्रेसने पुढाकार घेतला असून नजीकच्या काळात 25 हजार रक्त पिशव्या संकलित करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. त्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्यावर्षी याच काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळीही युवक काँग्रेसने पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित केली. तेव्हा राज्यभरातून 28 हजार 500 रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मदतीला धावून आले होते. आता पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना या उपक्रमाची पुन्हा आठवण झाली.

या पार्श्वभूमीवर तांबे यांनी पुन्हा एकदा ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण पाहता रक्ताचा तुडवडा देखील मोठ्या प्रमाणात भासत आहे. सरकार तसेच आरोग्य यंत्रणा आपापल्या परीने उपाययोजना करत आहेत. मात्र अनेक रक्तपेढ्यांत रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.’

गेल्या वर्षी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पुढाकाराने राज्यभरात राबवलेल्या रक्तदान शिबिरामार्फत सुमारे 28 हजार 500 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. यावर्षीही आपल्याला किमान 25 हजार रक्तपिशव्या संकलनाचा पल्ला गाठायचा आहे. रक्तदान करून आपल्याला आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे. गेल्यावर्षी युवक काँग्रेसतर्फे रक्तदानाचा उपक्रम व्यापक प्रमाणात हाती घेण्यात आला होता. स्वत: तांबे यांनीही रक्तदान केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिबिरे घेऊन अथवा जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले होते. यावेळी पुन्हा एकदा असा उपक्रम हाती घेण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या राज्यात सर्वत्र रक्ताचा मोठा तुडवडा असून यामुळे सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Visits: 17 Today: 2 Total: 118861

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *