पतसंस्थेच्या कर्मचार्‍याचा कारनामा; साडेसतरा लाखांची फसवणूक नेवासा पोलिसांत व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरुन कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या कर्मचार्‍याने खातेदारांच्या स्वीकारलेल्या रकमा खात्यात न भरता साडेसतरा लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पतसंस्थेचे व्यवस्थापकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन कर्मचारी दत्ता नरसू लष्करे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पतसंस्थेचे व्यवस्थापक अंकुश जगन्नाथ धनक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नेवासा खुर्द येथील लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत 2004 पासून व्यवस्थापक पदावर काम करत आहे. पतसंस्थेचे दैनिक अल्पबचत ठेव प्रतिनिधी दत्ता नरसू लष्करे याने दैनंदिन ठेव रक्कम स्वीकारली व तसे पुस्तकात नमूद केले. परंतु खात्यावर रक्कम भरली नसल्याचे दिसून आले. तसेच काही रकमा खोट्या स्वाक्षरी करून परस्पर काढल्याचे दिसून आले. तसेच काही नावे व्हाऊचर दप्तरी आढळली नाहीत. त्यावरुन आम्ही दैनिक अल्पबचत ठेव खाते पुस्तकांची तपासणी केली असता एकूण 33 खात्यांपैकी 19 दैनिक अल्पबचत ठेव खातेधारकांच्या खात्यातील रक्कम व पुस्तकातील नोंदीमध्ये फरक दिसून आले. ही रक्कम 6 लाख 65 हजार 34 एवढी कमी असल्याचे दिसून आली. तसेच लकर रजिस्टरच्या नोंदी तपासल्या असता लकर रजिस्टरला रोख रकमा काढल्याबद्दल व ठेवण्यात आल्याबाबत नोंदी करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले.

तरी रोखपाल व रोख रक्कम लकर आणि दैनिक अल्पबचत ठेवी रक्कम जमा करणारा प्रतिनिधी पतसंस्थेचा कर्मचारी दत्ता नरसू लष्करे याने 1 मे, 2021 ते 9 फेब्रुवारी, 2022 या दरम्यान स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता पदाचा गैरापर करुन दैनिक अल्पबचत ठेवीदारांची एकूण 6 लाख 65 हजार 34 एवढी रक्कम तसेच 10 लाख 85 हजार 918 रुपये रोख असा एकूण 17 लाख 50 हजार 852 रुपयांचा अपहार केला असल्याने त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. यावरुन नेवासा पोलिसांनी गुरनं. 510/2022 भारतीय दंडविधान कलम 408, 409, 420, 465, 467, 468, 471, 473 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116046

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *