तांबे हॉस्पिटलचा मेडीकव्हर हॉस्पिटलसोबत करार सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनात आरोग्य सुविधा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असून संगमनेर तालुका, नगर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी तातडीने मिळाव्यात यासाठी मेडीकव्हर इंटरनॅशनल हॉस्पिटल बरोबर तांबे हॉस्पिटलचा सेवा करार झाला आहे. यामुळे सर्व स्पेशालिस्ट डॉक्टरांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत सुविधा नागरिकांना तांबे हॉस्पिटल येथे त्वरीत उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जगातील बारा देशांमध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य सुविधा देणार्या मेडीकव्हर या हॉस्पिटल समवेत तांबे हॉस्पिटलचा सेवा करार झाला. यावेळी मेडीकव्हर हॉस्पिटल (ग्लोबल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन स्टूबिंगटन, मेडीकव्हर हॉस्पिटल (भारत) कार्यकारी संचालक हरिकृष्णा, मेडीकव्हर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन बोरसे, मेडीकव्हर हॉस्पिटल भारतचे वरीष्ठ उपाध्यक्ष नीरज इलाल, तांबे हॉस्पिटलचे संचालक डॉ.हर्षल तांबे आदी उपस्थित होते.

संगमनेर हे उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा देण्यासाठी महत्त्वाचे शहर आहे. डॉ.सुधीर तांबे यांनी बी.जे. मेडिकल पुणे येथून एम. एस. सर्जनची पदवी घेतल्यानंतर संगमनेर शहरात वैद्यकीय सेवा सुरू केली. 1984 मध्ये स्वतंत्र तांबे हॉस्पिटलच्या माध्यमातून अविरतपणे जनसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांचे हक्काचे ठिकाण म्हणून तांबे हॉस्पिटलचा लौकिक झाला. पुढे 2009 मध्ये या हॉस्पिटलला आधुनिकतेची जोड देत सुसज्ज, प्रशस्त व आधुनिक सुविधा असलेल्या सुपर स्पेशालिटी तांबे हॉस्पिटलमधून हृदयरोग, शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, अस्थिरोग, किडनी रोग, अतिदक्षता विभाग, स्वतंत्र अपघात विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, पोटाचे विकार, कर्करोग, नेत्ररोग, बालरोग अशा विविध आजारांवर स्वतंत्र उपचार केले जात आहे.

मेडीकव्हर हॉस्पिटल हे जगातील बारा देशांमधून 26 हॉस्पिटलमध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा देत आहे. तांबे हॉस्पिटल हे भारतातून या हॉस्पिटल बरोबर करारबद्ध होणारे सतरावे आधुनिक हॉस्पिटल ठरणार आहे. या करारामुळे तांबे हॉस्पिटलमध्ये सर्व सुपर स्पेशलिटी डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध असणार असून सर्व आधुनिक, उच्च व अद्यावत दर्जाच्या सुविधाही दिल्या जाणार आहेत. कमी वेळ, माफक दर व शाश्वत उपचार हे या हॉस्पिटलची त्रिसूत्री असून या हॉस्पिटलमध्ये सर्व मेडिक्लेम, इन्शुरन्स व महात्मा फुले जीवनदायी योजनेसह सर्व शासकीय योजनाही तातडीने लागू होणार आहेत. या नव्या करारामुळे संगमनेर, उत्तर अहमदनगर जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित उच्च व गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा तातडीने मिळणार आहे.
