‘लॉकडाऊन’ नव्हे, कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत! जीवनावश्यक व शेतीपुरक व्यवसायांसह सार्वजनिक वाहतुकही सुरु राहणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8 वाजेपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांपर्यंत नेमका संदेश न पोहोचल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दैनिक नायकच्या माध्यमातून लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला असून उद्यापासून ‘लॉकडाऊन’ नव्हे तर कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यानुसार आज रात्री 8 वाजेपासून सदरचे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. सरकारच्या नवीन आदेशानुसार जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता उर्वरीत सर्व व्यवसाय 30 एप्रिलपर्यंत नव्हेतर पुढील आदेश येईस्तोवर बंद ठेवण्यात येणार आहेत. उद्यापासून शहरात वृत्तपत्रे, औषधे, बेकरी माल, किराणा, भाजीपाला, शेतीविषयक औषधे अथवा अवजारे, पावसाळ्याच्या संबंधी सुरु असणारी आस्थापने, ई कॉमर्स सेवा, मीडिया हाऊसेस, खासगी कार्यालये व बँका सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट नागरिकांना बसण्यासाठी बंद राहतील, मात्र सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत त्यांना पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय तालुक्यातील सर्व उद्योग व कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी असून मालाचे उत्पादन करण्यावर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. निर्बंधांच्या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सर्वसामान्य माणसांच्या वावरावर कोणतेही निर्बंध असणार नाही, मात्र सार्वजनिक वावरतांना सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. त्यासोबतच सार्वजनिक वाहतुक व्यवस्था व माल वाहतुकीवरही कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
येत्या काही दिवसांपर्यंत अशाच पद्धतीचे निर्बंध लागू राहील्यानंतर बंद राहणारी दुकाने अथवा मॉलच्या चालकांनी आपल्या आस्थापनेत आवश्यक ते बदल करुन घ्यावेत, जसे दुकानाच्या दर्शनी भागात फेस शील्ड अथवा काच बसवून घेणे, ऑनलाईन पद्धतीने पेमेंट सुविधा सुरु करणे, दुकानातील कामगार अथवा कर्मचार्यांचे लसीकरण करणे या गोष्टींची पूर्तता करुन ठेवावी. जेणे करुन येत्या काही दिवसांत बंद असणारी दुकानेही सुरु करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र तो पर्यंत केवळ अत्यावश्यक श्रेणीतील दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
Optical shop chalu asel ki nahi