लाचखोर पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी एसीबीच्या जाळ्यात! चोरीचे सोने घेतल्याचा ठपका ठेवीत एक लाखांची लाच घेतांना रंगेहात अडकला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवैध व्यावसायिकांशी ‘अर्थपूर्ण’ घनिष्ट संबंधांमुळे छोट्याशा कारकीर्दीतही सतत चर्चेत राहीलेल्या, पोलीस खात्याची नोकरी म्हणजे फक्त पैसा कमावण्याचे साधन समजणार्‍या आणि त्याच हेतूने महिन्याकाठी लाखोंची उड्डाणे घेणार्‍या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी आज एसीबीच्या जाळ्यात अडकला. चोरीचे सोने घेतल्याचा ठपका ठेवीत कारवाईचा दम भरुन एका सोनाराकडून तब्बल एक लाख रुपयांची लाच स्विकारतांना नाशिकच्या पथकाने त्याच्या मूसक्या आवळल्या. विशेष म्हणजे आपण अडकल्याचे लक्षात येताच त्याने पळून जाण्याचाही यशस्वी प्रयोग केला, मात्र जिगरबाज एसीबीच्या अधिकार्‍यांनी त्याचा पाठलाग करीत त्याला क्रीडा संकुलाजवळ गाठलेच.या कारवाईनंतर राणा परदेशी आणि त्याचे रंगीतसंगीत किस्से उजेडात येवू लागले असून सोमवारीच तो त्याच्या कुटुंबासमवेत एका वाळु तस्कराची पार्टी झोडून आल्याचीही चर्चा सुरु आहे. त्याची यापूर्वीच वसई पोलीस ठाण्यात बदली झाली आहे, मात्र त्याने अद्याप येथील पदभार सोडला नव्हता. त्याच्यासोबतच विशाल पावसे नावाच्या एका खासगी ‘एजंटला’ही ताब्यात घेण्यात आले आहे.


गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबररोजी विद्युत वसाहतीत एक आश्‍चर्यकारक चोरीचे प्रकरण समोर आले होते. आपल्याच घराचा कडी-कोयंडा उचकटून जन्मदात्या आईच्या दागिन्यांसह तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरणार्‍या व मित्राच्या मदतीने नाशिकमध्ये ते विकणार्‍या दोघांना चारच दिवसांपूर्वी याच लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाने गोव्यातून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून त्याने कोठे कोठे चोरीचे सोने विकले याची माहिती मिळवत परदेशी याने त्या सोनारांनाच नागवण्यास सुरुवात केली. अर्थात हा प्रकार शहर पोलिसांसाठी नवा बिल्कुल नव्हता, यापूर्वीही याच पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या जाचाला कंटाळून श्रीरामपूर येथील एका सोनाराने आत्महत्या केली होती.


या प्रकरणात मात्र नागवला जात असलेला सोनार निडर निघाल्याने पत्ता परदेशीवरच उलटला आणि लाचखोर उपनिरीक्षकच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा झाला. याबाबत संबंधित सोनाराने नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नाशिकच्या पथकाने शहर पोलीस ठाण्याभोवती सापळा रचला, यावेळी राणा परदेशी याने संबंधिताकडून एक लाख रुपयांची लाच स्विकारताच एसीबीने त्याच्यावर झडप घातली. मात्र हरामाच्या पैशातून गलेलठ्ठ झालेला हा अधिकारी त्यांच्या पंजातून निसटला, मात्र तो याप्रकरणातून सुटू शकला नाही.


एसीबीच्या जिगरबाज अधिकार्‍यांनी दुचाकीवरुन क्रीडा संकुलाच्या रस्त्याने पळून चाललेल्या या लाचखोराला अखेर गाठलेच. तेथून त्याची अक्षरशः धिंड काढीतच त्याला पोलीस ठाण्यात आणले गेले. सध्या त्याच्यावर कारवाईची प्रक्रीया सुरु असून अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या प्रकरणाने संगमनेर शहर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सदरचे प्रकरण शेवटपर्यंत नेवून संबंधित अधिकार्‍यावरील दोष सिद्ध करावेत व गेल्या काही कालखंडापासून सामान्यांच्या मनातील डागाळलेली शहर पोलिसांची प्रतिमा पुन्हा पुर्ववत करावी अशी मागणी आता सामान्य संगमनेरकर करु लागला आहे. मोठ्या कालावधीनंतर कोणीतरी हिंमत केल्याने शहर पोलीस ठाण्यातील गैरकारभार चव्हाट्यावर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्येक प्रकरणात पैशांचाच वास घेणारा पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी सामान्य माणसांना नकोसा तर अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांना ‘हवासा’ अधिकारी बनला होता. कोणत्याही प्रकरणातून पैसा काढण्याचा त्याचा हातखंडा पाहून पोलीस खात्यात संपूर्ण हयात घालणार्‍यांनाही आश्‍चर्याचे धक्के बसत. विशेष म्हणजे कालच (ता.2) परदेशी आपल्या कुटुंबासह एका हॉटेलात वाळु तस्कराची ‘खमंग’ पार्टी झोडून आल्याचीही माहिती दैनिक नायकच्या हाती आली आहे. यावरुन हा अधिकारी स्वतःच्या कष्टातून काहीतरी तर घेत होता की नाही? असाही सवाल निर्माण झाला आहे.

सदरचा लाचखोर पोलीस उपनिरीक्षक वर्षभरापूर्वीच शिडीहून संगमनेरात बदलून आला होता. एका वर्षाच्या अल्प कालावधीतच त्याने मोठी माया गोळा केली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची येथून वसई पोलीस ठाण्यात बदलीही झाली होती, मात्र तत्पूर्वी त्याने केलेल्या चोरीच्या तपासातील मलिदा लाटूनच जाण्याचा विचार केला आणि तो त्याच्या पंटरसह एसीबीच्या जाळ्यात अडकला. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने प्रचंड माया जमविल्याची चर्चा असून एसीबीने त्याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Visits: 88 Today: 2 Total: 1101945

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *