वांबोरी उपसा योजनेची मुख्य जलवाहिनी धामोरीमध्ये फुटली पन्नास फूट उंचीपर्यंत पाण्याचा फवारा उडून लाखो लिटर पाणी वाया
नायक वृत्तसेवा, राहुरी
धामोरी खुर्द येथे गुरुवारी (ता.1) दुपारी दीड वाजता वांबोरी उपसा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली. मुळा धरणातून वांबोरी योजनेच्या जलवाहिनीद्वारे आवर्तन सुरू असल्याने, ती फुटलेल्या ठिकाणी पन्नास फूट उंचीपर्यंत पाण्याचा फवारा दोन तास सुरू होता. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले.
मुळा धरणातून वांबोरी योजनेच्या सहा फूट व्यासाच्या लोखंडी जलवाहिनीद्वारे 95 क्यूसेकने आवर्तन सुरू आहे. धामोरी खुर्द येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने आसपासच्या शेतांत पाणी गेले. शिवाजी सोनवणे यांच्या घराच्या बांधकामासाठी आणलेल्या सिमेंटच्या दोनशे गोण्या भिजल्या. संजय सोनवणे यांचे अर्धा एकर घास पीक पाण्याखाली गेले. लेंडी नाल्याद्वारे पाणी देव नदीला मिळाले. धामोरी- वांबोरी रस्त्यावरील लेंडी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहिले. जलसंपदा खात्याला माहिती समजताच मुळा धरण येथील योजनेच्या पंपगृहातील तिन्ही वीजपंप बंद करण्यात आले. सायंकाळी साडेतीन वाजता पाणी बंद झाले.
वांबोरी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली. त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांकडे केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
– मच्छिंद्र सोनवणे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राहुरी)