साई मंदिर रात्री पावणेआठपर्यंतच खुले राहणार! रात्रीची जमावबंदी लागू केल्याने संस्थानचा निर्णय

नायक वृत्तसेवा, शिर्डी
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने रात्रीची जमावबंदी लागू केल्याने शिर्डीतील साईमंदिराच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. साईसमाधी मंदीर आता सकाळी सव्वासात ते रात्री 7.45 या वेळेतच भाविकांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानतर्फे देण्यात आली. रात्री आणि पहाटेच्या आरत्या नेहमीच्या वेळेवर होतील, मात्र त्यासाठी भाविकांना प्रवेश देण्यात येणार नाही.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 14 नोव्हेंबर, 2020 पासून मंदिर खुले करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने विविध सेवाही पूर्ववत केल्या जात होत्या. मात्र, पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारे 28 मार्चपासून रात्री 8 ते सकाळी 7 यावेळेत जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे मंदिरातील दर्शनासाठीची वेळ बदल्याचा निर्णयही संस्थानतर्फे घेण्यात आला. त्यानुसार साई समाधी मंदिर भाविकांसाठी सकाळी 7.15 ते रात्री 7.45 या वेळेत खुले राहणार आहे. तर साईप्रसादालय सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 यावेळेत ठेवण्यात येणार आहे.

साईबाबा मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी संस्थानच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सकारने लागू केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व्यस्थेत बदल करण्यात आले आहेत. भाविकांसाठी मंदिराची वेळ बदलली असली तरी रात्री साडेदहा आणि पहाटे साडेचार वाजता होणारी आरती नेहमीच्या वेळेवर होईल. मात्र, त्यासाठी भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 97 Today: 1 Total: 1106349

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *