बिरेवाडीमध्ये चोरट्यांनी सत्तर हजारांचा ऐवज लांबविला
बिरेवाडीमध्ये चोरट्यांनी सत्तर हजारांचा ऐवज लांबविला
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बिरेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सोन्याचे दागिने, मोबाइल व शेळी असा सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना सोमवारी (ता.17) रात्री साडेदहा वाजता घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत मंगळवारी (ता.18) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सुमन दत्तू सोडनर ही मेंढपाळ महिला तरंगे वस्ती मांडवे बुद्रूक येथील राहणार असून ते आपल्या मेंढ्या चारण्यासाठी बिरेवाडी येथील ढेंबरे यांच्या शेतात घेवून आले होत्या. सोमवारी दिवसभर मेंढ्या चारून रात्री ढेंबरे यांच्या शेतात सोडनर यांनी पाल ठोकून वाघूरमध्ये सर्व मेंढ्या बंदिस्त केल्या. त्यानंतर महिलेचे पती व मुलगा हे सर्वजण जेवन करुन झोपी गेले. रात्री साडेदहा वाजता चार अज्ञात चोरटे आत घुसले आणि शेळी, कोकरू चोरून घेऊन जात असताना त्याचवेळी सुमन सोडनर यांना जाग आली. त्यांनी मोठमोठ्याने चोरऽऽ चोर म्हणून आरडाओरड केला. त्यामुळे चोरट्यांनी कोकरू जागेवर सोडून शेळीला घेऊन पलायन केले. त्याचवेळी महिलेनी पालात पाहिले असता चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम व शेळी असा एकूण सत्तर हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सुमन सोडनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 299/2020 भादंवि कलम 379, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्सटेबल दशरथ वायाळ हे करत आहे. दरम्यान, चोरट्यांनी ‘पुन्हा’ पठारभागास आपले लक्ष्य केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.