संतापजनक! बौद्धिक अक्षम तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न! पठारभागातील संतापजनक घटना; घारगाव पोलिसांकडून दोघांना अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे अवकाळी पावसाने होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरु असतानाच दुसरीकडे या संधीचा गैरफायदा घेवून दोघांनी संतापजनक प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले ाहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात बुधवारी रात्री घडत असलेला हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पीडितेच्या भावाने घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी वाल्मिक व अक्षय घाणे या दोघा सख्ख्या भावांना अटक केली आहे. या घटनेने पठारभागासह संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.2) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी 37 वर्षीय पीडित तरुणीच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बुधवारी तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाल्याने पठारभागाचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता. अशावेळी आई-वडील, पत्नी व 37 वर्षीय जन्मतः कर्णबधिर व बौद्धिक अक्षम असलेल्या राजश्री या आपल्या बहिणीसह राहणार्या कुणालने (दोघांची नावे बदलली आहेत) रात्रीचे जेवण उरकल्यानंतर राजश्री नेहमीप्रमाणे गावातील जुन्या घरात झोपण्यासाठी गेली व मागे राहिलेली मंडळीही त्याच तयारीत होती.
राजश्री जुन्या घरी गेल्यानंतर काही वेळातच ती किंचाळू लागल्याने घरापासून काही अंतरावर राहणार्या तिच्या चुलतभावासह त्याच्या पत्नीने तेथे धाव घेतली. त्यावेळी वाल्मिक रोहिदास घाणे हा तिच्या अंगावर बसून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व त्याच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी राजश्री धडपडत असल्याचे त्या दोघांनी पाहिले. हा प्रकार पाहून संतापलेल्या पीडितेच्या चुलत भावाने आरोपीची कॉलर पकडली व त्याला घराबाहेर ओढून आणले. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने त्याच्या हाताला हिसका मारुन तेथून पळ काढला. यावेळी पीडितेचा चुलत भाऊ आरोपीच्या मागे धावला असता पुढे जाताच लपून बसलेला अक्षय रोहिदास घाणे याने देखील धूम ठोकली.
त्यावरुन दोघांनी ठरवून हा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर पीडितेच्या चुलत भावाने कुणालला फोन करुन सगळा प्रकार सांगितला. या प्रकाराने धक्का बसलेला कुणाल आपल्या पत्नीसह लगेच जुन्या घराकडे धावला. त्यावेळी चुलत भावाने डोळ्यांनी पाहिलेला प्रकार त्याला सांगितला. त्यातून पारा चढलेल्या दोघाही भावांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आपली खैर नाही ही गोष्ट लक्षात आल्याने दोघेही तेथून पसार झाले.
या प्रकरणी पीडितेचा भाऊ कुणाल याने गुरुवारी (ता.3) दुपारनंतर घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी वाल्मिक व अक्षय रोहिदास घाणे या दोघा विकृतांविरोधात भारतीय न्यासंहितेच्या कलम 74, 333, 64, 62, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना गुरुवारी दुपारनंतर जेरबंद केले आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या घटनेत जन्मतःच कर्णबधिर व बौद्धिक अक्षम असलेल्या तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार घडल्याने तालुक्यात संताप निर्माण झाला असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.