जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनकडून पुन्हा लॉकडाऊनकडे..! अहमदनगरसह उत्तरेतील पाच तालुक्यातील कोविडस्थिती पुन्हा जैसे थे अवस्थेत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची गती अद्यापही कायम असून अहमदनगर वगळता उत्तर नगर जिल्ह्यातील चार तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. यापूर्वी अहमदनगर खालोखाल संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आता ती जागा राहाता तालुक्याने घेतली आहे. गेल्या 1 मार्चपासून जिल्ह्यात समोर आलेल्या एकूण रुग्णसंख्येतील 73 टक्के रुग्ण अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील आहेत. मराठवाडा व खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग सरासरी एक हजार रुग्णांवर गेल्याने काही ठिकाणी पुन्हा ‘लॉकडाऊन’ तर काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील रोजच्या रुग्णवाढीचा दर 479 रुग्ण प्रतिदिवस असून तूर्त जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ लागण्याची शक्यता नाही. मागील 25 दिवसांत जिल्ह्यात एकूण 11 हजार 980 रुग्ण समोर आले असून त्यात वरील पाच तालुक्यातीलच 8 हजार 692 रुग्णांचा समावेश आहे तर मागील 25 दिवसांत जिल्ह्यातील 46 जणांचा कोविडने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 88 हजार 84 झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात पूर्णतः नियंत्रणात असलेल्या कोविड स्थितीला लग्न समारंभांनी गालबोट लावल्याने मार्चमध्ये त्याचे दुष्परिणाम समोर आले. मागील चोवीस दिवसांत जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यात (महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण) दररोज सरासरी 180 रुग्णगतीने 4 हजार 405, राहाता तालुक्यात सरासरी 56 रुग्ण दररोज या वेगाने 1 हजार 400, संगमनेर तालुक्यात दररोज सरासरी 50 रुग्ण या वेगाने 1 हजार 246, कोपरगाव तालुक्यात सरासरी दररोज 34 रुग्ण या वेगाने 845 तर श्रीरामपूर तालुक्यात दररोज सरासरी 28 रुग्णवाढीच्या वेगाने 696 अशा या पाच तालुक्यात मिळून 8 हजार 692 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. ही संख्या जिल्ह्यातील मार्चमधील एकूण रुग्णसंख्येच्या तब्बल 73 टक्के आहे.

गेल्या आठ दिवसांपासून राहाता तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्णवाढीत राहात्याने संगमनेर तालुक्याला मागे टाकले आहे. राहाता तालुक्यातील 67 टक्के गावे कोविड संक्रमित झाली असून शिर्डी व लोणी परिसरात प्रादुर्भाव अधिक झपाट्यानेे वाढत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरुन दिसून येते. शिर्डीत साईबाबा मंदिर सुरू असल्याने व दररोज येथे मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावित असल्याने तेथील प्रादुर्भाव वाढल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे उत्तरेतील ज्या चार तालुक्यांमध्ये कोविड संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे त्या तालुक्यांच्या सीमारेषा एकमेकांना लागून आहेत आणि या तालुक्यातील नागरिकांचे व्यापाराच्या दृष्टीने एकमेकांच्या तालुक्यात सातत्याने जाणे-येणे असते.

आजही जिल्ह्यात विक्रमी रुग्ण समोर आले असून जिल्ह्यासह संक्रमणात आघाडीवर असलेल्या तालुक्यातील सरासरीतही मोठी वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात अहमदनगर महापालिका क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र मिळून तब्बल 508 रुग्ण समोर आले आहेत. त्या खालोखाल संगमनेर 148, राहाता 140, कोपरगाव 101, अकोले 74, शेवगाव 71, श्रीरामपूर 69, पारनेर 46, जामखेड 37, पाथर्डी 30, राहुरी 26, नेवासा 24, श्रीगोंदा 19, कर्जत 15, लष्करी परिसरातून 14 व अन्य जिल्ह्यातील 16 अशा एकूण 1 हजार 338 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यातील बहुतेक तालुक्यातील आजची रुग्णसंख्या आजवरची सर्वाधिक आहे. त्यामुळे जिल्हा आता हळूहळू ‘लॉकडाऊनच्या’ दिशेने निघाला आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1414801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *