कोविडच्या सावटाखाली साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवाची भक्तीमय सांगता..! चाळीस हजार घरगुती, अकरा मानाच्या तर साठ सार्वजनिक गणरायांचे बजरंगीकडून विधीवत विसर्जन

श्याम तिवारी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
यंदाच्या गणेशोत्सवावर कोविडचे सावट राहिल्याने तरुणाईच्या जल्लोशाला ब्रेक लागला होता. ना मिरवणुका, ना ढोलताशांचा गजर यामुळे यावर्षी गणेशोत्सवाचे दहा दिवस जाणवलेच नाहीत. मात्र त्याचा कोणताही परिणाम गणेशभक्तांच्या श्रद्धेवर पडल्याचेही दिसले नाही. मंगळवारी सकाळी मानाच्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या श्रींच्या पूजनाने सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री साडेआठ वाजता मानाच्या गणरायासह तान्हाजी मंडळाच्या श्रींच्या विसर्जनाने साजरा झाला. मुख्य विसर्जन मिरवणुकीतील पहिल्या आणि शेवटच्या श्रींचे एकाचवेळी विसर्जन हे यंदाच्या गणेशोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले. दिवसभर ‘कोविडचे संकट दूर सारा, पुढच्या वर्षी लवकर या..’ अशी भावनिक साद घालीत संगमनेरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. संगमनेर नगरपालिकेने शहरातील पंधरा ठिकाणी मूर्ती संकलन केले, तर शहरातील सर्व गणेशमूर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने स्वीकारुन या उत्सवाच्या साधेपणातही उत्सवाचे रंग भरले.


यावर्षी मार्चपासून देशात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाल्याने शासन व प्रशासनाने सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांवर प्रतिबंध आणले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. संगमनेरकरांनी त्याला संपूर्ण प्रतिसाद देत सहकार्याची भूमिका घेतल्याने अभूतपूर्व वातावरणात यंदाच्या गणेशोत्सवाची कोणत्याही धांगडधिंग्याशिवाय सांगता झाली. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळासह मुख्य मिरवणुकीत अगदी शेवटी सहभागी होणार्‍या तानाजी युवक मंडळाच्या गणरायाचे रात्री साडेआठच्या सुमारास एकाचवेळी विसर्जन करण्यात आले. संगमनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेला हा प्रसंग कोविडच्या सावटखालीही लक्ष्यवेधी ठरला.


मंगळवारी सकाळी आठ वाजता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार, नगरसेवक जयवंत पवार, किशोर पवार आदिंच्या उपस्थितीत मानाच्या सोमेश्वर-रंगारगल्ली मंडळाच्या गणरायाची विधीवत पूजा करण्यात आली. यानंतर घराघरातील गणेश मूर्तींचे पूजन करुन काहींनी नगरपालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर तर अनेकांनी थेट नदीपात्रालगत जावून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.

नगर पालिकेकडून मूर्ती संकलन..
यंदाच्या गणेश विसर्जनाच्या दिनी प्रवरानदीपात्रात सुमारे पाच हजार क्युसेक्सचा प्रवाह असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी व कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कोणालाही थेट नदीपात्रात जावून विसर्जन करण्यास मनाई केली होती. त्यासाठी पालिकेने शहर व उपनगरातील पंधरा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. त्या माध्यमातून जवळपास साडेतीन हजार मूर्तींचे संकलन झाले. सायंकाळी यासर्व मूर्ती बजरंग दलाच्या माध्यमातून प्रवरापात्रात विसर्जित करण्यात आल्या.

एनएसयूआय व एकविरा फौंडेशनचे कृत्रिम हौद..
वर्षभर अथवा दहा दिवस श्रद्धापूर्वक पूजन केलेल्या श्रींचे आपल्या हातूनच विसर्जन व्हावे अशी अनेकांची मनोमन इच्छा असते. यंदा मात्र या इच्छेला कोविडने मर्यादा आणली होती. मात्र त्यावरही पर्याय निर्माण करीत काँग्रेसप्रणित एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेसह एकवीरा फौंडेशनने फिरते हौद तयार केले होते. शहर व उपनगरातील प्रत्येक प्रभागात जावून या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरकरांना विसर्जनाची सुविधा दारासमोर उपलब्ध करुन दिली होती.

बजरंग दलाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक..
बहुतेक दरवर्षी विसर्जनाच्या दिनी प्रवरानदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी राहत असल्याने गेल्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष नदीपात्रात श्रींच्या विसर्जनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते घेत असतात. यंदा या जबाबदारीत लक्षणीय वाढ झाली होती. प्रशासनाने सामान्य नागरिकांना थेट पात्रालगत जाण्यासच मज्जाव केल्याने सार्वजनिक गणेश मंडळांसह सुमारे चाळीस हजार घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्याची मोठी जबाबदारी या दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उचलली होती. रात्री उशीरापर्यंत विसर्जनाच्या ठिकाणी थांबून त्यांनी पूर्णही केली. कार्यकर्त्यांनी प्रत्येक गणरायाला अत्यंत श्रद्धापूर्वक निरोप दिल्याने संगमनेरकरांमधून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

मोठ्या मूर्तींसाठी क्रेन तर घरगुती गणपतींसाठी तराफा..
बजरंग दलाने अपघातमुक्त विसर्जनासाठी प्रवरानदीपात्रात तराफा तयार केला होता. त्यावर छोट्या मूर्ती ठेवून त्या प्रवाहात विसर्जित केल्या जात होत्या. अशा पद्धतीने जवळपास चाळीस हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तीसाठी महादेव घाट परिसरात खास क्रेनची सोय करण्यात आली होती. या क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्ती उचलून त्या मुख्य प्रवाहात सोडण्यात आल्या.

पुरोहित संघाने केले पन्नास हजार मूर्तींचे पूजन..
थेट नदीपात्रात जाण्यास मज्जाव असल्याने संगमनेरकरांना मूर्ती संकलन केंद्र अथवा बजरंग दल या दोनच माध्यमांकडे आपले बाप्पा सुपूर्द करावे लागले. मात्र प्रत्येक गणेशभक्तांच्या भावनांचा विचार करुन संगमनेर पुरोहित संघाने नदीपात्रावर येणार्‍या सर्व बाप्पांच्या विधीवत पूजनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी व त्यांचे सहकारी नदीपात्रावर उपस्थित होते. पन्नास मूर्ती संकलित झाल्यावर त्यांची सामूहिक आरती करुन तराफ्याद्वारे त्यांचे विसर्जन केले जात होते. पुरोहित संघाने संगमनेरकरांच्या भावनांचा आदर राखल्याने त्यांच्या कार्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 118355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *