अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ऊस उत्पादकांकडे अगस्ति लक्ष देईल ः पिचड अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा 28 वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा उत्साहात
नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकर्यांचे ऊसाचेही नुकसान झाले आहे तरी शेतकर्यांनी हवालदिल होऊ नये. तुमच्या पडलेल्या ऊसाकडे अगस्ति सहकारी साखर कारखाना लक्ष देईल असा विश्वास अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी दिला.
अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा 28 वा बॅायलर अग्निप्रदिपन सोहळा रविवारी (ता.10) राज्याचे माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष सीताराम गायकर, योगी केशवबाबा चौधरी, ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे, कचरु शेटे, राजेंद्र डावरे, महेश नवले, प्रकाश मालुंजकर, सुनील दातीर, सुधाकर देशमुख, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजणे, भास्कर बिन्नर, सुरेखा देशमुख, मनीषा येवले, अशोक आरोटे, अशोक देशमुख, रामनाथ वाकचौरे, कार्यकारी संचालक अजित देशमुख, बाजार समितीचे सभापती पर्बत नाईकवाडी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष पिचड म्हणाले, देशात साखरेचे उत्पादन जास्त व ग्राहक कमी असल्याने साखरेला बाजारभाव मिळत नाही. कारखान्यांनी उसापासून साखर बनवायची, गोडावून भरून ठेवायची आणि बँकेचे व्याज भरायचे अशी परिस्थिती आहे. आता बँकांनीही साखर कारखान्यांना मदत करण्याचे धोरण घेतले पाहिजे. आपल्या अगस्ति कारखान्याची प्रगती अतिशय चांगली असून गेल्या काही वर्षात अगस्ति बरोबरची अनेक साखर कारखाने बंद पडली आहे. अगस्तिने चालू वर्षात विक्रमी ऊस उत्पादन कार्यक्षेत्रात केले आहे. शेरणखेल, जाचकवाडी सारख्या भागातही चांगला उस निर्माण केला आहे. अजून 2 ते 4 वर्ष अडचणीचे आहेत. निळवंडेचे कालवे सुरु झाले कि तळेगाव सारख्या भागातही मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन वाढेल व जिल्ह्यातील कारखान्यांना कोणता ऊस न्यावा हा प्रश्न निर्माण होईल.
सहा लाखांच्या आत ऊसाचे गाळप झाले तर तोटा नाही होणार. त्यामुळे चालू हंगामात 6 लाखांपेक्षा अधिक करु. त्यासाठी बाहेरचा ऊसही आणला जाईल तसेच काही कटू निर्णयही घ्यावे लागतील. त्यामुळे सर्व दृष्टीने संचालक मंडळ विचार करेल. कारखान्याची प्रतिदिनी गाळप क्षमता 2200 वरुन 3500 पर्यंत केली आहे. इथेनॅाल प्रकल्प सुरु केला असून यावर्षी त्यातून इथेनॅाल व आरएसचे 1 कोटी लिटर उत्पादन केले जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात साखर उत्पादनाबरोबर इथेनॅाल निर्मिती प्रकल्प हे अगस्ति स्वयंपूर्ण होण्यासाठीचे पाऊल आहे. प्रकल्प उभारून कारखाना चालविणे अवघड आहे. कर्जाशिवाय कारखाना चालवू शकत नाही. उत्पादक शेतकरी, संचालक, कामगार, अधिकारी असे एकत्र येवून सर्वांच्या भावनेचा विचार करुन कारखाना चालवू. सर्वांच्या त्यागातून उभा राहिलेला अगस्ति कारखाना उत्तमप्रकारे चालू राहील असा विश्वासही पिचड यांनी व्यक्त केला.
आज कार्यक्षेत्रात 4 ते 4.50 लाख मेट्रीक टन ऊस आहे. उच्चांकी ऊस कार्यक्षेत्रात निर्माण केला आहे. मार्च अखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस तोडून नेणार आहे. दररोज कर्यक्षेत्रातील 2500 ते 2700 टन ऊस व बाहेरील 800 ते 900 टन ऊस गाळप केले जाणार आहे. 6 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट अगस्ति पूर्ण करणार आहे. साखरेला भाव टिकून राहिले तर यावर्षी तोटा न होता तोंडाला तोंड तरी मिळेल. 28 व्या गळीत हंगामाची अगस्ति कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज बॅायलर प्रदिपन झाले. येत्या 15 तारखेला गव्हाणीत मुळी टाकून गळिताचा शुभारंभ होईल, उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले.
बॅायलर पूजन ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे-अरुणा पांडे, सुभाष येवले-मनीषा येवले, सुनील दातीर-नीलम दातीर, सुधाकर देशमुख-सुरेखा देशमुख, भास्कर बिन्नर-भीमाबाई बिन्नर, कर्मचारी प्रतिनिधी बाळकृष्ण आंबरे-संगीता आबरे यांनी केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी सुधीर शेळके, भरत हासे, नानापाटील वाकचौरे, दिलीप हासे, सुरेश मुंडे, ताराचंद नवले व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय पोखरकर यांचा कारखान्याचेवतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय सूचना अशोक देशमुख यांनी मांडली. सूत्रसंचलन एकनाथ शेळके व सयाजीराव पोखरकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक संचालक महेश नवले यांनी केले. शेवटी कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी आभार मानले.