पहिल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद! सहाशेहून अधिक स्पर्धकांमधून निवडला गेला राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशनने बृहन् महाराष्ट्र योग परिषदेच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या पहिल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सहा वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धांमध्ये राज्यातील सहाशेहून अधिक योगासनपटू सहभागी झाले होते. त्यात अहमदनगरमधील स्पर्धकांनी बाजी मारतांना तब्बल अकरा पारितोषिके पटकाविली. विशेष म्हणजे या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या पहिल्याच स्पर्धेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद असोसिएशनचा उत्साह द्विगुणीत करणारा ठरल्याची प्रतिक्रीया फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनने देशभरातील विविध राज्यात या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने 22 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धा घेतल्या गेल्या. लहान, मध्यम आणि वरीष्ठ अशा तीन गटांत झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या 617 स्पर्धकांनी योगासनांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करतांना विविध गटातील पारितोषिके पटकाविली.

या स्पर्धेत मुलांच्या लहान गटात अहमदनगरच्या प्रीत निलेश बोरकर याने प्रथम, श्रृमल मोहन बाणाईत याने दुसरा व कोल्हापूरच्या युग शितल मेहेत्रे याने तिसरा क्रमांक पटकाविला. पुण्याचा अरविंद राजू सबावत आणि अहमदनगरच्या निबोध अविनाश पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. याच वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत अहमदनगरच्या तृप्ती रमेश डोंगरे, रत्नागिरीच्या स्वरा संदीप गुजर व अहमदनगरच्या वैदेही रुपेश मयेकर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. तर तेजस्विनी जगदिशराय खिंची व गीता सारंग शिंदे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविली.

मुलांच्या मध्यम गटात पुण्याच्या नितीन तानाजी पवळे, अहमदनगरच्या जय संदीप कालेकर आणि ओम महेश राजभर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा तर पुण्याच्या सिद्धार्थ मधुकर डावरे व अहमदनगरच्या रुपेश मोगलाली सांगे आणि सुमीत दिलीपकुमार बंडाळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. मुलींच्या गटात अहमदनगरच्या मृणाली मोहन बाणाईतने पहिला क्रमांक पटकाविला. कोल्हापूरच्या सेजल सुनील सुतार व रत्नागिरीच्या तन्वी भूषण रेडिज यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा तर नागपूरच्या सुहानी भाऊराव गिरीपूंजे व रचना विलास अंबुलकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

वरीष्ठ गटात मुंबईच्या रुद्र भारत दातखिळेने पहिला क्रमांक पटकाविला. कोल्हापूरच्या घननील दादाराव लोंढे व मेहुलकुमार डी.जोशी यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा तर गोंदियाच्या रामानंद देवाजी राऊत आणि सागर रघुनाथ शितकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. मुलींच्या गटात सांगलीच्या क्षितीजा सुहास पाटील, रत्नागिरीच्या पूर्वा शिवराम किनारे व पुण्याच्या आकांक्षा रमेश खर्डे यांनी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. नागपूरच्या कल्याणी विलास चुटे व सृष्टी दीपक शेंडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

चलचित्र (व्हिडीओ) फेरी, उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम अशा साखळीत झालेल्या या पहिल्याच राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत राज्यातील सातशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ऑनलाईन पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आयोजित झालेल्या या स्पर्धेसाठी राज्य असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, सचिव डॉ.संजय मालपाणी व स्पर्धा संचालक सतीश मोहगावकर, बृहन् महाराष्ट्र योग परिषदेचे सरकार्यवाह डॉ.अरुण फोडस्कर आदिंच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करण्यात आले होते.


क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर राष्ट्रीय योगसन स्पोर्टस् फेडरेशनने आपली संलग्न संस्था महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून राज्य पातळीवरील ही पहिलीच स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील 617 स्पर्धकांनी सहभाग घेतला. तीन गटात झालेल्या या स्पर्धेतून येत्या 24 ते 27 मार्च दरम्यान फेडरेशच्यावतीने घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवडही करण्यात आली.

Visits: 76 Today: 2 Total: 1106175

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *