नेवाशामध्ये प्रशासनाच्या नियोजनाखाली गणेश मूर्तींचे शांततेत विसर्जन

नेवाशामध्ये प्रशासनाच्या नियोजनाखाली गणेश मूर्तींचे शांततेत विसर्जन
बाराशे घरगुती तर सतरा मंडळांच्या मूर्तींचे संकलन करुन प्रवरामाईत विसर्जन
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा येथे सुमारे बाराशे घरगुती तर सतरा मंडळांच्या गणपतींचे पोलीस व नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजनाखाली गणेश मूर्तींचे संकलन करून नगरपंचायत कर्मचार्‍यांच्या मार्फत शांततेत विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली. कोरोना महामारीच्या संकटामुळे यावर्षीचा गणेशोत्सव ढोल-ताशांच्या गजराविना व मिरवणुकीविना पार पडला.


शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनासाठी खास व्यवस्था केली होती. विसर्जनासाठी नेवासा शहरातील प्रवरा नदीजवळ असलेल्या गणपती घाट परीसर सकाळी 8 वाजता स्वच्छ करण्यात आला होता. निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली होती. तर तीन ट्रॅक्टर व एक तीन चाकी वाहन गणेश मूर्तींचे संकलन करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. यासाठी शहरात गाडी फिरून लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत होत्या. दुपारी 12 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रत्येक प्रभागातून आणलेल्या गणेश मूर्तींचे घाटावर एकत्रित करण्यात आले.


पोलीस उपअधीक्षक जवळे, पोलीस निरीक्षक डेरे, मुख्याधिकारी शेख, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, नगरसेवक संदीप बेहळे, राजेंद्र मापारी, माजी सरपंच सतीश गायके, गफूर बागवान यांच्यासह पत्रकार मकरंद देशपांडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर मुख्य घाटावरील मानाच्या गणपतीची आरती ज्येष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण व लघू उद्योजक जयंत मापारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती घाटावर गर्दी होऊ नये म्हणून बॅरिकेड्स लावून घाटाच्या प्रवेशद्वारावरच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे इतरांची गर्दी दिसून आली नाही. मुख्याधिकारी शेख यांनी कर्मचार्‍यांबरोबर स्वतः मूर्ती मोटार बोटमध्ये ठेवण्यासाठी मोलाची सेवा दिली. साखळी पद्धतीचा अवलंब करून प्रवरेच्या मध्यधारेवर नेऊन विसर्जन करण्यात आले. प्रशासन व पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गणेश विसर्जन सामाजिक अंतराचे पालन करत शांततेत पार पडले. याकामी नेवासा, सोनई, शनिशिंगणापूर पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.


नेवासा शहरातील प्रवरा नदी घाटावर तसेच प्रवरासंगम येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरासह प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदीर प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तालुका हद्दीतून गणेश विसर्जनासाठी येणार्‍या मूर्ती ग्रामपंचायतच्यावतीने ताब्यात घेण्यात येत होत्या. संकलित केल्यानंतर पोलीस व प्रवरासंगम ग्रामपंचायतचे कर्मचारी हे घोटेश्वर मंदिराच्या घाट पायरीवर नेऊन विसर्जन करत होते. औरंगाबाद व गंगापूर भागातील गणपती देखील गंगापूर पोलीस ताब्यात घेऊन ते विसर्जित करत होते. त्यामुळे विसर्जन शांततेत पार पडले.
– रणजीत डेरे (पोलीस निरीक्षक, नेवासा)

Visits: 203 Today: 1 Total: 1574402

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *