गौतम हिरण हत्याकांड; पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत 22 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. आरोपींच्या कोठडीची मुदत शुक्रवारी (ता.19) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके याप्रकरणी तपास करत आहेत.
पोलिसांना आरोपींकडून अपहरणासाठी वापरण्यात आलेली नाशिक येथील व्हॅन मिळून आली आहे. त्यात हिरण यांचा मोबाइल, चेकबुक तसेच पावत्याही हस्तगत करण्यात आल्या. अपहरणावेळी व्हॅनवर लक्ष ठेवण्यासाठी एका दुचाकीचा वापर करण्यात आला होता. ती देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपींचे मोबाइल कॉल्स तसेच माहिती मिळविण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ती मान्य झाली असून, यापूर्वी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेले पूर्वीचे आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे गुन्ह्यातून त्यांची नावे वगळण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. त्यामुळे वायकर व गंगावणे या दोघांची प्रकरणातून सुटका होणार आहे.