वाकडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना पकडले स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळाले

नायक वृत्तसेवा, राहाता
दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यातील चौघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपींकडून 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (ता.18) पहाटे दोनच्या सुमारास वाकडी (ता.राहाता) शिवारात करण्यात आली.

वाकडी शिवारातील गोटेवाडी कालव्याजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत काही व्यक्ती दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन टपरीला घेराव घातला. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी वाहने सोडून पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून शुभम अनिल काळे, भरत ऊर्फ भर्‍या तात्याजी काळे (दोघेही रा.गणेशनगर, ता.राहाता) यांना ताब्यात घेतले, तर चौघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडे चौकशी केली असता, आनंद अनिल काळे, अक्षय यशवंत आव्हाड, गणेश भिकाजी तेलोरे (तिघेही रा.गणेशनगर, ता.राहाता) व राहुल वाघमारे (रा.रांजणगाव, ता.राहाता) अशी पळून गेलेल्यांची नावे त्यांनी सांगितली. पोलिसांनी दोन दुचाकी, तलवार, गलोल, मोबाईल व मिरची पूड असा एकूण 71 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. पोलीस नाईक संतोष लोंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींवर औरंगाबाद, नेवासा, वाळुंज, पाथर्डी पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या दोन्ही दुचाकी नगर येथून चोरी केलेल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *