आंबेवंगण खून प्रकरणातील आरोपींना केले गजाआड राजूर पोलिसांच्या दमदार कामगिरीचे होतेय कौतुक

नायक वृत्तसेवा, राजूर
तालुक्यातील आंबेवंगण येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या दोन तासांत जेरबंद करण्यात राजूर पोलिसांना यश आले आहे. या दमदार कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आंबेवंगण शिवारातील धोंडू पांडुरंग खेताडे हे वडील पांडुरंग खेताडे व आई विमल खेताडे असे घरी असताना बबलू कदम, प्रमोद घारे (दोन्ही रा. मान्हेरे) व त्यांचे मित्र विकास गभाले, वैभव डगळे, वैभव गभाले, सागर भोईर, अक्षय कोंडार, विठ्ठल पोटकुले, विनोद शिंदे, नकुल मुंढे व इतर ३ ते ४ अनोळखी इसम यांनी धोंडू खेताडे हे सचिन इदे यास त्याचे व बबलू कदम याच्यासोबत असलेले ‘वाद मिटवून घे’ असे म्हणाले. याचा राग मनात धरून मोटारसायकलींवर धोंडू खेताडे यांच्या घरी येऊन घरात घुसून एकाने घराच्या दरवाजाची कडी आतून लावून घेऊन धोंडू खेताडे व त्यांचे आईवडीलांना लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये वडील पांडुरंग सोमा खेताडे यांचा मृत्यू झाला तर धोंडू खेताडे व आई विमल खेताडे गंभीर जखमी झाले.

त्याबाबत धोंडू खेताडे यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून वरील दहा जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २६१/२०२३ भारतीय दंडसंहिता कलम ३०२, ३२४, ३२३, ४५२, ३४२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी आरोपींचा शोध घेणे कामी दोन पथके तयार करून अवघ्या दोन तासांच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक जी. एफ. शेख, पोहेकॉ. मुंढे, नेहे, पोलीस नाईक डगळे, महिला पोलीस नाईक वाडेकर, पोकॉ. अशोक गाढे, सुनील ढाकणे, अशोक काळे, साईनाथ वर्पे, सचिन शिंदे, फटांगरे यांनी केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे हे करत आहेत.
