पुण्याच्या ‘प्रिन्सला’ संगमनेरच्या चंदनापुरी घाटात लुटले! शहरातील वाटमारीचे लोण आता घाटात; तालुका पोलिसांसमोर नवे आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी मृत्युघंटा म्हणून वाहनचालकांच्या मनात धडकी भरवणारा चंदनापुरीचा घाट आता वाटमारीच्या घटनेने चर्चेत येवू पाहत आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी भर दुपारी समोर आला असून पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येणार्या एका दुचाकीस्वाराची दिशाभूल करुन त्याला जुन्या घाटाच्या दिशेने पाठवित चौघांनी त्याला लुटण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी चौघा अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी अशाच पद्धतीच्या वाटमारीचे प्रकार संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दित घडत होते. मात्र पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शहरातील ‘ती’ टोळी जेरबंद केल्यानंतर त्याचे लोण आता महामार्गावरील घाटरस्त्यांवर पोहोचल्याने तालुका पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.28) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटात घडली. पुण्यातील कासारवाडीत (भोसरी) राहणारा प्रिंस ललीत शर्मा हा बावीसवर्षीय तरुण व्यावसायिक पुण्यात आयोजित सुवर्ण अलंकारांच्या प्रदर्शनाचे संगमनेरातील मोठ्या सराफांना निमंत्रण देण्यासाठी आपल्या दुचाकीवरुन पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येत होता. दुपारी दोनच्या सुमारास तो चंदनापुरी घाटातील गुंजाळ पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोहोचला असता रस्त्यावर उभ्या असलेल्या एकाने त्याला हात दाखवून थांबवले.

यावेळी ‘त्या’ अनोळखी इसमाने पुढे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून तुम्ही जुन्या मार्गाने गेल्यास त्यातून सुटू शकता असा सल्ला त्यांना दिला. त्यावर भरवसा ठेवून त्या तरुण व्यावसायिकाने आपली दुचाकी गुंजाळ पाटील महाविद्यालयाजवळील वळण रस्त्याने जुन्या घाटारस्त्यावर घेतली व तो त्या मार्गाने संगमनेरच्या दिशेने पुढे निघाला असता जुन्या महामार्गावरील गणपती मंदिराजवळ आधीपासूनच थांबलेल्या चौघांनी त्याला थांबवले. यावेळी त्यातील एकाने शर्मा यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील चांदीची साखळी, हातातील चांदीचे कडे, रेडमी कंपनीचा मोबाईल आणि पाकीटातील दीड हजार रुपयांची रोकड असा एकूण 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला व ते चौघेही अज्ञात चोरटे पल्सर व पांढर्या रंगाच्या एक्टिव्हा दुचाकीवरुन वरच्या भागात पसार झाले.

या प्रकाराने भयभीत झालेल्या प्रिंस शर्मा याने पुण्यात फोन करुन घडला प्रकार सांगितल्यानंतर त्याने तालुका पोलिसांकडे धाव घेतली. याबाबतची माहिती मिळताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, प्रभारी निरीक्षक सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक ईस्माइल शेख यांनी तत्काळ चंदनापुरी घाटात धाव घेत आसपासचा परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना चोरट्यांचा मागमूस काढता आला नाही. दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या जबरी चोरीच्या या घटनेची नोंद रात्री साडेनऊ वाजता करण्यात आली व त्याचा तपास उपनिरीक्षक ईस्माइल शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या घटनेने आत्तापर्यंत वाहन चालकांसाठी सुरक्षित मानला जात असलेला चंदनापुरी घाटही आता चोरट्यांच्या टप्प्यात आल्याने कधीकाळी मृत्युघंटा म्हणून धडकी भरवणार्या या घाटात आता चोरट्यांचे उद्योग सुरु झाले आहेत.

गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीपासून संगमनेर शहराच्या परिसरात पहिल्यांदाच वाटमारीच्या घटना घडू लागल्या होत्या. सुरुवातीला पालिकेच्या एका माजी नगरसेवकाचे चारचाकी वाहन समनापुर बायपास चौफुलीवर लुटल्यानंतर जोर्वे-निंभाळे रस्त्यावर दुचाकीस्वारांना रस्त्यात अडवून त्यांना लुटले जावू लागले. एकामागून एक घडत गेलेल्या या घटनांनी या रस्त्यावरुन जाणार्यांमध्ये दहशत निर्माण केल्याने पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी या प्रकरणांचे तपास आपल्याकडे घेत या भागात घडलेल्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या तिघांची टोळी जेरबंद केली. त्यानंतर येथील प्रकार थांबलेले असताना आता त्याचे लोण पुणे-नाशिक या अतिशय वर्दळीच्या महामार्गावर पोहोचल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू लागले आहे.

नवीन पुणे-नाशिक महामार्ग सुरु झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून अतिशय धोकादायक वळणं असलेला चंदनापुरीचा संपूर्ण घाटरस्ता ओसाड पडला आहे. या मार्गाचा वापर केवळ या परिसरात राहणार्या स्थानिकांसह वनविभागाचे चंदनापुरी नर्सरीतील कर्मचारी करतात. त्यामुळे बहुतेक निर्मनुष्य असलेल्या या रस्त्यावर अनेकदा अनैतिक प्रकारही सुरु असतात. अशातच आता या रस्त्याचा वापर वाहन चालकांना लुटण्यासाठीही होवू लागल्याने पोलिसांची जबाबदारी वाढली आहे.

