‘तुमचा जीव, तुमचीच जबाबदारी’ या शासकीय भूमिकेने सामान्यांचे हाल! काही खासगी रुग्णालयांचा ‘लुटीचा’ खेळ पुन्हा जोमात; 65 टक्के ‘पॉझिटिव्ह’ चाचण्यांचे अहवाल खासगी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पाऊल ठेवणार्या कोविडचा संगमनेर तालुक्यातील प्रादुर्भाव पुन्हा भरीला आला आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात ओस पडलेली खासगी रुग्णालये कोविड बाधितांच्या गर्दीने पुन्हा गजबजू लागली आहेत. त्यातच दुसर्या संक्रमणाच्या सुरुवातीलाच शासनाने ‘तुमचा जीव, तुमचीच जबाबदारी’ असं स्पष्ट करणारा निर्णय घेत तालुकास्तरावरील कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) बंद केली आहेत. त्याचा थेट फायदा आता काही खासगी रुग्णालयांना झाला असून सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लुट पुन्हा एकदा जोमाने सुरु झाली आहे. सध्या प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालयात केवळ स्राव चाचणीची सुविधा सुरु आहे, मात्र त्यालाही मर्यादा असल्याने अनेकजण खासगी रुग्णालयांमध्ये स्राव देत आहेत. या महिन्यात आत्तापर्यंत समोर आलेल्या पॉझिटिव्ह अहवालांपैकी 65 टक्के अहवाल खासगी प्रयोगशाळांकडून मिळाले आहेत. काहींचे अहवाल ‘निगेटिव्ह’ येवूनही रुग्णाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याच्या संतापजनक प्रकाराचीही शहरात चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संगमनेर व अकोले तालुक्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयातील कोविड आरोग्य केंद्र पूर्ववत सुरु करण्याची गरज आहे.
नोव्हेंबरनंतर देशात कोविडचे दुसरे संक्रमण होईल असा वैद्यकीय जाणकारांचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र कोविडच्या वाढलेल्या संक्रमणाकडे दुर्लक्ष करुन देशवासीयांनी दिवाळीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणेच खरेदी आणि त्यासाठी गर्दी करुनही डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या प्रती दिवस 30 रुग्ण या सरासरीत घट होवून ती 26 रुग्ण प्रती दिवसांपर्यंत खाली आली. नववर्षातील पहिल्या महिन्यात त्यात प्रचंड घट झाली आणि तालुक्यातील संक्रमणाच्या सरासरीत मोठ्या कालावधीनंतर मोठी घट होवून ती 9 रुग्ण दररोज या गतीपर्यंत खालावली. 16 जानेवारीला देशात लसीकरणाचा पहिला टप्पाही सुरु झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये एकप्रकारची शिथीलता येवू लागली. प्रशासनही कोविडच्या कामांना वैतागल्यागत होवून आपापल्या कामात व्यस्त झाले होते. जबाबदार्यांचे खांदेपालटही उरकले होते. त्याच दरम्यान शासनाने तालुकास्तरावरील गोरगरीब रुग्णांसाठी कोविडकाळात वरदान ठरलेली कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) बंद करण्याचा निर्णय घेतला. खासगी रुग्णांलयांनीही दीर्घकाळ कोविड रुग्णांचा वावर असलेल्या आपल्या इमारती ‘सॅनिटाईज’ करुन ‘रुटीन’ रुग्णांसाठी सुरु केल्या होत्या. जणूकाही सगळं अलबेल होत असल्याचाच तो अभास होता.
याच संधीचा फायदा घेवून मूळात लोकांमध्येच असलेला कोविड लग्नांच्या धुराड्यातून फक्त जागा झाला. आणि फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्याचा कोविड आलेख पुन्हा एकदा आकाशाकडे धावू लागला. जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव अहमदनगरच्या मुकूंदनगर व जामखेडमधून पसरला. मात्र त्याची सर्वात मोठी झळ नगरनंतर संगमनेर तालुक्यालाच बसली हे वास्तव आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील साडेसात हजारांहून अधिक जणांना कोविडचे संक्रमण झाले. आत्तापर्यंत अधिकृतपणे तालुक्यातील साठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोविड मृत्यूंची अधिकृत संख्याही तब्बल 1 हजार 184 इतकी आहे. प्रत्यक्षात मागील दहा महिन्यांच्या कालावधीत एकट्या संगमनेर तालुक्यात मृत्यू पावलेल्या शेकडों नागरिकांपैकी सुमारे सहाशेहून अधिक नागरिकांचा कोविड संशयित म्हणून मृत्यू गृहीत धरुन त्यांचा अंत्यविधी कोविडसंबंधी नियमांचे पालन करुनच झाला आहे. त्यावरुन या महामारीची दाहकता लक्षात येईल.
नववर्षात कोविड जाईल असे अपेक्षित असतांना, ग्रामीण रुग्णालयात केवळ स्राव चाचण्याची सुविधा सुरु ठेवून कोविड उपचार बंद करण्याचा निर्णय अंमलात आलेला असतांना कोविड परतला आणि त्याने जिल्ह्यातील काही तालुक्यात हाहाकार माजवला. संगमनेर त्यात मागीलवेळी प्रमाणेच अग्रणी असल्याने साहजिकच सामान्य रुग्णांसाठी सुरु झालेली खासगी रुग्णालये कोविड रुग्णांसाठी सज्ज होवू लागली. आणि आजच्या स्थितीत बहुतेक तुडूंबही झालीत. कोविड उपचारांसाठी जिल्हाधिकार्यांनी विशेष आदेशान्वये दर निशिचत केलेले आहेत. भरारी पथकामार्फत कोविड उपचार करणार्या रुग्णालयात छापे मारुन तपासणी करण्याचे अधिकारही ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आले आहेत. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तिवर असलेल्या डॉ.संदीप कचेरिया यांच्यावर संगमनेरचा भार सोपविण्यात आला आहे.
कोविडच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचे सॅच्युरेशन कमी झाल्याचे भासवून त्यांना रेमडेसिवीर लस देण्याची गरज निर्माण होते. त्यासाठी पहिल्या दिवशी दोन व त्यानंतर दररोज एक असा डोस ठरलेला असतो. रेमडेसिवीरच्या एका लसीची बाजारात किंमत 5 हजार 400 रुपये आहे. शासनाने काही औषधालयांना सवलतीच्या दरात या लस विकण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार संगमनेरातील प्रवरा मेडिकल येथे कागदपत्रांची पूर्तता केल्यास 1 हजार 860 रुपयांना ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र काही रुग्णालयांमधून रुग्णांच्या नातेवाईकांकडे या लसीच्या परिणामतेवर शंका व्यक्त करुन आपल्याकडचीच लस घेण्याचा आग्रह धरुन मूळ किंमतीच्या आसपास रक्कम घेवून आर्थिक लुट करण्याचा धंदाही जोमात आहे.
पैशांच्या हव्यासापायी शहरातील एका रुग्णालयाने चक्क निगेटिव्ह अहवाल दडपून दाखल झालेला रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे भासवण्यात आल्याची शहरात चर्चा सुरु आहे. मागील वर्षी कोविड असाच ‘बहरलेला’ असताना कोविडची परस्पर चाचणी करुन परस्पर उपचार करण्याचा ठपका ठेवून नाशिकच्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालांना मनाई करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश इंन्सीडेंट कमांडरांनी देवूनही तालुका वैद्यकीय अधिकार्यांना गुन्हा दाखल करण्यात चालढकल केली होती. आता या प्रकरणातही पुन्हा त्यांच्याच नावाची चर्चा शहरात सुरु आहे.
एकंदरीत कोविडचा परतलेला प्रादुर्भाव म्हणजे मोठी संधी आहे, त्यातच उपचारांना एकमेव पर्याय खासगी रुग्णालयेच असल्याने ‘पॉझिटिव्ह’च्या नावाखाली सर्वसामान्यांची लुट पुन्हा एकदा जोमात सुरु झाली आहे. यंत्रणा आपापल्या कामातच व्यस्त असल्याने संगमनेरात कोविड आनंदाने संचारतोय. कोविडबाबत पोलीस विभागाकडून होत असलेल्या आणि त्याही एकाच भागातील रस्त्यांवर का? असा आरोप झालेल्या कारवाया वगळता बाकी सगळीकडे अलबेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज संगमनेरात येत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेवून ते यावर कार्य निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
शासनाने घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील ‘ट्रामा सेंटर’मध्ये कोविड आरोग्य केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली होती. स्थानिक प्रशासनाने तेथे सुविधा निर्माण करण्यासाठी ‘संगमनेर सहाय्यता निधी’च्या नावाखाली संगमनेरकरांना आवाहनक करुन मोठा निधी जमवला व संगमनेरात जवळपास शंभर खाटांचे सुसज्ज कोविड आरोग्य केंद्र सुरु झाले. मात्र आज कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा ऑक्टोबरच्या 33 रुग्ण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 42 रुग्ण दररोज या गतीवर असतांनाही लोकांनीच निधी देवून सुसज्ज केलेले संगमनेरातील कोविड रुग्णालय लोकांसाठी बंद आहे.