संगमनेरातील सहदुय्यम निबंधकांचे कार्यालय अनधिकृत? कनिष्ठ लिपीकासह करार संपलेल्या कर्मचार्यांच्या हाती सूत्रे; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा गंभीर आरोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या काही वर्षापासून संगमनेरात सहाय्यक दुय्यम निबंधकांची दोन कार्यालये कार्यरत आहेत. यातील एक कार्यालय तहसीलच्या आवारात तर दुसरे प्रशासकीय भवनाच्या परिसरात आहे. तहसीलच्या परिसरातील कार्यालयात मात्र सहदुय्यम निबंधक पदावरील अधिकारीच नसून गेल्या तीन वर्षांपासून सदरचा पदभार एका कनिष्ठ स्तरावरील लिपीकाच्या हाती आहे. तर उर्वरीत तिघा कर्मचार्यांचा सेवा करार संपुष्टात येवूनही ते कार्यरत असल्याने हे कार्यालयच अनधिकृत ठरले आहे. या कार्यालयाचे कामकाज नेहमीच वादग्रस्त ठरले असून एक कार्यकर्ता स्वतःच आपल्या नोंदी करतो तर येथे कामकाजासाठी येणार्या दिव्यांग व वयस्करांना अपमानास्पद वागणूक देत दलालांना पायघड्या घातल्या जात असल्याने या अनागोंदीला कोणाचे पाठबळ आहे असा गंभीर सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल खताळ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी पुण्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रारही केली आहे. खताळ यांच्या या आरोपांनंतर संगमनेरात एकच खळबळ उडाली असून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल खताळ यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये दिलेल्या अर्जातून सदरची बाब समोर आली आहे. त्यानुसार तालुक्यातील नागरिकांचे वाढते व्यवहार लक्षात घेता महसूल व नोंदणी विभागाने संगमनेरात सहदुय्यम निबंधकांची दोन कार्यालये सुरु केली. मात्र तहसील आवारातील कार्यालय सुरु करताना सहदुय्यम निबंधकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. त्या ऐवजी बेकायदेशीरपणे कनिष्ठ स्तरावर काम करणार्या आर. आर. उदलमुगले यांच्याकडे वर्ग दोन श्रेणीत मोडणार्या या कार्यालयाची धुरा सोपविण्यात आली. गेल्या 2019 पासून तेच या पदाची जबाबदारी सांभाळीत आहेत. राज्यातील अन्य सर्व ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज पात्र असलेले दुय्यम व सहदुय्यम निबंधक पाहत असतांना संगमनेरचे हे कार्यालय त्याला अपवाद कसे असा सवालही खताळ यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दुसर्या क्रमांकाच्या या कार्यालयात एकूण चार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात कनिष्ठ स्तर लिपीक पदावरील आर. आर. उदलमुगले यांच्यासह कंत्राटी पद्धतीने तीन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयाचे प्रमुख म्हणून वर्ग दोनच्या श्रेणीतील सहदुय्यम निबंधकांची नियुक्ती आवश्यक असताना त्याऐवजी त्यांचे कामकाज कनिष्ठ लिपीक सांभाळीत आहेत. त्यातच त्यांच्या हाताखाली काम करणार्या या तिघाही कर्मचार्यांच्या सेवा कराराची मुदतही गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. नियमानुसार त्या दिवसापासून या कर्मचार्यांचा सदर कार्यालयाशी कोणताही कायदेशीर संबंध शिल्लक नसतानाही ते आजही आपापली पूर्वीची कामे करीत आहेत. हा सर्व प्रकार बोगस आणि बेकायदा असल्याचा घणाघाती आरोपही खताळ यांनी केला आहे.
शासनाची एकप्रकारे फसवणूक करुन सुरु असलेल्या या प्रकाराबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने या सर्व घटनांमागे राजकीय दबाव तर कारणीभूत नाही ना? अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपीक असलेला एखादा कर्मचारी सलग तीन वर्ष पात्रता नसतानाही एखाद्या पदावर कसे काय काम करु शकतो? महसूल विभागाची त्याच्यावर विशेष मर्जी असण्याचे कारण काय? अशा बेकायदा नियुक्ति झालेल्या कर्मचार्याला एकाच पदावर तीन वर्ष ठेवता येते का? जर कनिष्ठ पदावरील कर्मचारी तीन-तीन वर्ष वर्ग दोनच्या पदावर काम करणार असतील तर हा राज्यात प्रमाणिकपणे काम करणार्या अधिकार्यांवर अन्याय नाही का? असे सावालही खताळ यांनी उपस्थित केले आहेत. याबाबत त्यांनी पुण्याच्या नोंदणी महानिरीक्षकांसह मुद्रांक नियंत्रकांकडे तक्रारही दाखल केली आहे. त्यावर कारवाई न झाल्यास प्रसंगी या बेकायदा कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. खताळ यांच्या आरोपांनी संगमनेरातील राजकीय वातावरण ढवळले असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
संगमनेर येथील सहदुय्यम नोंदणी कार्यालयातील बोगस नियुक्ती, कंत्राटी कर्मचार्यांचा कार्यकाल याबाबत आपण पुणे विभागाच्या नोंदणी महानिरीक्षकांसह मुद्रांक नियंत्रकांकडे तक्रार केली आहे. यासोबतच या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक आर. आर. उदलमुगले यांच्या हितसंबंधातील एक खासगी दलाल नियमबाह्य पद्धतीने कार्यालयातील संगणकावर स्वतःच्या दस्ताची स्वतःच बेकायदापणे नोंदणी करताना नेहमी दिसतो. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आपण केली आहे. यावर ठराविक कालावधीत कारवाई न झाल्यास या कार्यालयाला टाळे ठोकणार आहे.
– अमोल खताळ
माहिती अधिकार कार्यकर्ते, संगमनेर