कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचा उद्रेक; गुरुवारी 117 बाधित आढळले कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याबरोबरच कडक निर्बंध लागू करण्याची गरज

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
नगर, संगमनेर, राहाता तालुक्यासह कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. गुरुवारी (ता.18) दिवसभरात तब्बल 117 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे नुसते कंटेन्मेंट झोन जाहीर करुन भागणार नाहीये, तर कडक निर्बंध लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोनाचे संकट अधिक गडद होण्यास वेळ लागणार नाही.

नगर ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने बुधवारी (ता.17) तब्बल 85 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 35 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 12 व्यक्तींची रॅपिड चाचणी करण्यात आली. यामध्ये सात पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत सर्वाधिक म्हणजे 74 व्यक्ती बाधित आढळले.

यामुळे सर्व मिळून रेकॉर्ड ब्रेक 117 रुग्ण आढळून आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. गुरुवारी दिवसभरात 33 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजअखेर तालुक्यात 320 सक्रीय रुग्ण असून, 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील नागरिक कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहे. दिवसेंदिवस शहरात मोठी गर्दी होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. संचार करताना अनेकांच्या तोंडाला मास्क लावलेले नसते. तर मास्क लावण्यास सांगितले तर, ‘जे व्हायचे ते होऊ द्या’, अशी भाषा वापरली जाते. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. यामुळे प्रशासनाने आता खंबीर पावले उचलून कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 116583

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *