रस्ता खुला करण्यासाठी चैतन्यपूर ग्रामस्थांचे उपोषण!

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी विद्यमान सरपंचासह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. आज चौथ्या दिवसअखेरही उपोषण सुरूच असून, सरपंचाची प्रकृती खालावली आहे.

चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता हा रस्ता गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून वाहतुकीस खुला होता. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून एका ग्रामस्थाने रस्ता अडविला आहे. यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसीलदारांना निवेदने देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. तथापि तहसीलदारांनी त्याची दखल घेतली नाही. उपोषणास बसण्यापूर्वी 70 ते 80 ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली असता हा रस्ता माझ्या अखत्यारीत येत नाही. तुम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद देवून करा असे सांगितले. तर पोलिसांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकारी तक्रार दाखल करू शकतात असे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा रस्ता वाहतुकीस खुला करावा, ग्रामस्थांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत व रस्त्याचे रखडलेले काम त्वरीत सुरू करावे या मागण्यांसाठी सरपंच नितीन डुंबरे यांच्यासह सहा ग्रामस्थ सोमवारपासून (15 मार्च) आमरण उपोषणास बसले आहेत. आज चौथ्या दिवसअखेर त्यांची प्रकृती खालावली असून काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा नीलेश गवांदे व ग्रामस्थांनी दिला आहे.

आमदार डॉ.किरण लहामटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सरपंच नितीन डुंबरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सदर रस्त्याची आडवणूक करणारी व्यक्ती रस्ता खुला करण्यास राजी असूनही प्रशासन काहीही कार्यवाही करत नसल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला असून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 115349

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *