अजबच रेऽ देवा! ठेकेदाराने शेतकर्याचा ‘मुरुम’ पळवला! संगमनेर तालुक्यातील घटना; बगलबच्चांनी धमकावत मालकालाच पिटाळले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुन्हेगारी घटना आणि त्यामागील घारगाव पोलिसांची भूमिका या कारणावरुन सतत चर्चेत राहणार्या तालुक्यातील पठारभागातून आता अजबच प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेत भोजदरी जिल्हामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराने संबंधित शेतकर्याच्या संमतीशिवाय त्याच्या मालकीच्या जागेतून परस्पर मोठ्या प्रमाणात मुरुम उपसला. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर ‘त्या’ बापड्याने आडदांग ठेकेदाराला रोखण्याचाही प्रयत्न केला. मात्र उलट त्याच्या बगलबच्चांनी त्या शेतकर्यालाच धमकावत त्याच्याच जागेतून त्याला पिटाळून लावले. या सगळ्या प्रकारातून घाबरलेल्या ज्ञानेश्वर बबन कोकाटे या शेतकर्याने अखेर संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांकडे धाव घेतली असून उपसलेल्या गौणखनिजाचा मोबदला आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत पठारभागातील कोठे बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानेश्वर बबन कोकाटे यांनी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार परस्पर दांडगाई करुन मुरुम चोरीचा हा प्रकार गेल्यावर्षी मार्चमध्ये घडला होता. कोठे खुर्द येथील के.बी.के.कन्स्ट्रक्शन कंपनीने जिल्हा परिषदेतंर्गत येणार्या राज्यमार्ग क्रमांक 56 (कोठे बु.-वनकुटे-भोजदरी) या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम घेतले होते. 13 मार्च 2024 रोजी ठेकेदाराला या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतर त्याने लागलीच कामालाही सुरुवात केली. सामान्यतः ठेकेदाराला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्याला स्वतःलाच करावी लागते. त्यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण खर्च निविदा प्रक्रियेत गृहीत धरलेला असतो.
मात्र कोठे खुर्दच्या या ठेकेदाराला कदाचित हा नियम मान्य नसावा अथवा यापूर्वी त्याने अशाच प्रकारे वनविभागाच्या जमिनींमधून परस्पर पळवापळवी केली असावी. के.बी.के.कन्स्ट्रक्शन अशा नावातच ‘अजब’ असलेल्या या कंपनीच्या मालकाने अधिकचा पैसा मिळवण्याच्या लालसेने दांडगाई करीत कार्यारंभ आदेश मिळालेल्या रस्त्यालगतच कोकाटे यांच्या मालकीच्या जमिनीतून परस्पर मुरुमाचा उपसा करण्यास सुरुवात केली. या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम उपसल्यानंतर कोणाच्या तरी सांगण्यावरुन सदरचा प्रकार समजताच ज्ञानेश्वर कोकाटे यांनी आपल्या मालकीच्या जागेत धाव घेत तेथे सुरु असलेली मुरुमाची चोरी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित ठेकेदाराने पोसलेल्या त्याच्या बगलबच्चांनी त्यालाच अपमानित करीत त्याच्याच जागेतून पिटाळून लावले.
दुर्दैवाने त्याच दरम्यान कोकाटे यांच्या भावाचा अपघात झाल्याने त्याच्या उपचारांसाठी त्यांची धावपळ वाढली. त्या संधीचा फायदा घेत संबंधित ठेकेदाराने त्या शेतकर्याच्या जागेतून भरमसाठ प्रमाणात मुरुमाची परस्पर चोरी करुन कोठे ते भोजदरी रस्त्याचे काम आटोपले. दवाखान्याच्या प्रपंचाच्यातून उसंत मिळाल्यानंतर ज्ञानेश्वर कोकाटे यांनी संबंधित के.बी.के.कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला फोन लावून परस्पर मुरुम उचलल्याचा जाब विचारण्यासह त्याची भरपाई मागितली असता त्याने ‘देणार नाही, काय करायचे ते करऽ..’ असे म्हणत ‘त्या’ शेतकर्याचा फोन कट करुन टाकला. ‘उलटा चोर, कोतवाल को डांटे’ या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव घेणार्या या शेतकर्याने ठेकेदाराचा आडदांगपणा मोडून काढण्याचा चंग बांधून जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागात माहितीअर्ज दाखल केला.
मात्र येथेही त्यांना माहिती देण्यासाठी पूर्ण निर्धारित वेळेचा वापर झाल्यानंतरच ‘त्या’ रस्त्याच्या कामाचा ‘कार्यारंभ’ आदेश मिळाला. त्यातून ठेकेदाराच्या नावाची निष्पत्ती झाल्यानंतर ज्ञानेश्वर बबन कोकाटे या शेतकर्याने संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकार्यांकडे न्यायासाठी याचना केली आहे. त्यांनी मांडलेल्या आपल्या आर्जवामध्ये वरील सगळा घटनाक्रम नमूद करुन संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई आणि सोबत कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी त्यावर काय निर्णय घेतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
घेतलेली कामे पूर्ण न करताच बिलं काढण्याचे प्रकार, कामात निकृष्ट सामग्री वापरल्याचे आरोप, अर्धवट कामे अशा वेगवेगळ्या कारणांनी गाजणार्या ‘ठेकेदार संस्कृतीत’ आता खासगी जागेतून चक्क मुरुम चोरीचाही समावेश झाला आहे. अर्थात यापूर्वी अशा बहुतेक ठेकेदारांकडून शासकीय कामाच्या नावाखाली परस्पर नद्यांमधून बेसुमार वाळू उपसा आणि महसूल अथवा वनजमिनीतून मुरुम व अन्य गौणखनिजांच्या चोरीचे प्रकार तालुक्याला नवीन नाहीत. या घटनेत मात्र चक्क जमिनीच्या मालकालाच त्याच्या जागेतून हुसकावून गौण खनिजावर जणू ‘दरोडा’च घातला गेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार केवळ दंडात्मकच नव्हेतर फौजदारी कारवाईस पात्र आहे. त्यावर प्रांताधिकारी कोणत्या न्यायाची मोहोर उमटवतात हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.