दुचाकी अडवून एक लाखास लुटले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सिगारेट विक्री फेरीवाल्याची दुचाकी अडवून त्यास 1 लाख 5 हजारांस लुटल्याची घटना श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावरील खैरीनिमगाव शिवारात नुकतीच घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मनोज लक्ष्मण मगर हे सिगारेट विक्री करून पुणतांब्याहून श्रीरामपूरकडे येत असताना त्यांची हिरो होंडा दुचाकी (क्र.2784) ही चार अज्ञात चोरट्यांनी अडवून गाडीवरील मगर यास चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना धमकावत त्यांच्याकडील रोख रक्कम 50 हजार रुपये व 50 हजार रुपये किंमतीचे सिगारेट, मोबाईल असा एकूण 1 लाख 5 हजार 796 रुपयांचा ऐवज रस्तालुटीत चोरुन नेला आहे. या प्रकरणी मनोज मगर यांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.
