वाळूचोरांविरोधात जांबुतचे ग्रामस्थ आक्रमक! ग्रामसभेत तस्करी बंद करण्याचा ठराव; मुळा नदीला ग्रामस्थांचा खडा पहारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात बोकाळलेल्या वाळूतस्करीला पोलीस आणि महसलु विभागाचे आशीर्वाद असल्याने संपूर्ण तालुक्यातील वाळूचोर मुजोर बनले आहेत. त्याचा परिणाम अहोरात्र वाळू उपशातून सर्वसामान्यांना त्रास होत असूनही त्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही. मात्र संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील जांबुतच्या रहिवाशांनी आता स्वतःच यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या तीन दिवसांपासून शिवारातून होणारा वाळु उपसा बंद करण्यात आला आहे. त्यासाठी जांबुत बुद्रुकच्या ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून विशेष ठरावही केला असून जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकांना त्याची प्रत पाठविण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातून वाहणार्‍या सर्वच नद्यांमधून सध्या वाळूतस्करी जोमात आहे. जागोजागी आणि गावोगावी वाळूचोरांच्या टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्या या कृत्याला विरोध करणार्‍यांना थेट ट्रॅक्टरखाली चिरडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे डोळ्यादेखत नद्यांचे पात्र ओरबाडले जात असतांना आणि अहोरात्र अवजड वाहनातून वाळूची वाहतूक होत असल्याने रस्त्यांची अक्षरशः वाट लागलेली असतानाही सर्वसामन्य माणूनस या तस्कारांना अडवण्याची हिंमत करीत नाही इतकी दहशत या वाळूचोरांनी संपूर्ण तालुक्यात निर्माण केली आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदी म्हणजे तर वाळूतस्करांना आंदन दिल्यासारखी अवस्था आहे. पठारावरील एकट्या जांबुत बुद्रुक गावाच्या शिवारातून दररोज शंभर ते सव्वाशे डंपर वाळूचा उपसा होतो यावरुन या बेकायदा धंद्याची व्याप्ती सहज लक्षात येण्यासारखी आहे. मात्र असे असूनही वाळूचोरी रोखण्याची थेट जबाबादरी असलेल्या महसूल व पोलीस विभागाकडून तस्करांच्या या कृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून त्यातून या वाळूचोरांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे आता गावेच्या गावे संतप्त होवू लागली असून त्याची पहिली ठिणगी तालुक्याच्या पठारावरील जांबुत येथे पडली आहे.


येथील ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलावून गावच्या परिसरातून होणारा वाळू उपसा पूर्णतः थांबवण्याचा निर्णय घेतला असून गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जांबुत गाव मुळा नदीभोवती खडा पहारा देत आहे. याबाबत ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांसह पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदनासह ग्रामसभेच्या ठरावाची प्रत पाठविली आहे. या ठरावात परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वर्षभरापूर्वीच नवा रस्ता तयार झाला होता, मात्र काही महिन्यातच वाळु तस्करांनी त्याची वाट लावल्याचे म्हंटले आहे. शाळा सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी वाळु तस्करांच्या सुसाट वाहनांमुळे शाळेत जाण्याची हिंमत करीत नसल्याचेही जांबुतच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे पठारावरील वाळूतस्करी त्वरीत थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आमच्या गावाने प्रशासनाला वारंवार विनवण्या करुनही येथील वाळू उपसा थांबलेला नाही. त्यामुळे संपूर्ण गावाने एकी दाखवित ग्रामसभा बोलावून सर्वानुमते ठराव केला असून यापुढे आमच्या गावच्या परिसरातून वाळूतस्करी न होवू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जांबुत गावचे ग्रामस्थ नदीकाठी पहारा देत असून कोणताही ट्रॅक्टर अथवा डंपर नदीपात्रात दिसला तर तो आम्ही पकडून त्यावर कारवाई करण्यास भाग पाडणार आहोत.
– उत्तम बुरके
सरपंच : जांबुत बु.

वाळू उपसा ही आता गावागावांची समस्या बनली आहे. यातून भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी राजकारण सोडून सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि बेकायदा पद्धतीने सुरु असलेला वाळू उपसा थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी जांबुत गावाने पुढाकार घेतला असून ग्रामसभेत ठराव करुन या परिसरातील वाळू उपसा थांबविण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जांबुतसह तालुक्यातील नद्यांमधून होणारा अनधिकृत वाळू उपसा थांबवण्याची गरज आहे.
– मीरा शेटे
सभापती : जि. प. महिला व बालकल्याण समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *