कोरोनामुळे साईनगरीत अडीच महिन्यांत अकरा व्यक्तींच्या आत्महत्या! अर्थकारण ठप्प झाल्याने अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न झालाय निर्माण

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनामुळे साईनगरीतील अर्थकारण ठप्प झाले आहे. यातून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आर्थिक व मानसिक ताणतणावातून गेल्या अडीच महिन्यांत साईनगरीत तब्बल 11 व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत.
![]()
कोविडमुळे राज्यात अंशत: लॉकडाऊन असले तरी साईनगरी आर्थिकदृष्ट्या पूर्ण लॉकडाऊन आहे. नगरपंचायत, वीज वितरण कंपनी, बँकांंकडून थकबाकीसाठी सारखे तगादे सुरू आहेत. त्यातच जोडीला कोरोनाचा संसर्ग यामुळे सर्वांचीच आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गेल्या पंधरवड्यात वसुलीला कंटाळून एका भाजप पदाधिकार्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

शिर्डीत लहान मोठी साडेसातशे हॉटेल्स, लॉजिंग असून या व्यवसायावर जवळपास 50 हजार नागरिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. 16 नोव्हेंबरला मंदिर सुरू झाल्यानंतर शिर्डी पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र साईदर्शनाच्या विविध नियमावल्या, दर्शनाच्या वेळातील बदल, दर्शन पास व्यवस्थेतील बदल यामुळे भाविकच नाही तर शिर्डीकरही संभ्रमात आहे. मंदिरच बंद असल्याचा संदेश भाविकांमध्ये गेला आहे; यामुळे भाविकांचा ओघ एकदम कमी झाला आहे. अनेक भाविक बुकिंग रद्द करत आहेत. प्रसाद, पेढा आदिंना गिर्हाईक नसल्याने तो खराब होऊन फेकून द्यावा लागत आहे.

रोजीरोटीचाच प्रश्न…
शिर्डीतील हेडगेवारनगर भागात लहान-मोठी लॉजेस मिळून 500 रुम्स आहेत. गेल्या 15 दिवसांत 15 खोल्या सुद्धा भरल्या गेल्या नाहीत. लॉजेसवर 200 कामगावर व 50 महिला अवलंबून आहेत. यातून थेट रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकजण प्रसादालयात जेवण करुन दिवस काढत आहे, असे व्यावसायिक दीपक वारुळे व प्रदीप येवलेकर यांनी सांगितले.

शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या अडीच महिन्यात 37 अकस्मात मृत्यूंची नोंद झालेली आहे. यातील अकरा व्यक्तींनी गळफास किंवा विष घेऊन आपली जीवनायात्रा संपवली आहे.
– प्रवीण लोखंडे (पोलीस निरीक्षक, शिर्डी)
