जिल्हा बँकेत विखेंना शह देण्यात महाविकास आघाडी यशस्वी राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजप 7, काँग्रेस 4 आणि शिवसेना 1 जागांवर विजयी

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत अहमदनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती. भाजपने प्रथमच पक्ष म्हणून यात लक्ष घालण्याचे ठरविल्याने महाविकास आघाडीनेही जोर लावला. शेवटी भाजपच्याच नाराजांना फोडून माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना शह देण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले. महाविकास आघाडीतही सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्या खालोखाल भाजपच्या जागा दिसत असल्या तरी त्यात विखे यांना मानणारे केवळ दोघेच आहेत. विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीचा बदला घेण्यात भाजपचे असंतुष्ट नेते यशस्वी झाल्याचेही मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेली पाक्षांतरे आणि महाविकास आघाडीची आलेली सत्ता याचे पडसाद अद्यापही राजकारणात उमटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच सहकारी संस्थांमधील राजकारणही बदलत आहे. यात अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली. 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी निवडणूक घ्यावी लागली. त्यांचे निकाल आज जाहीर झाले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस 9, भाजप 7, काँग्रेस 4 आणि शिवसेना 1 असे उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे सात दिसत असले तरी त्यातील विखे यांच्या सोबत असलेले केवळ दोघेच आहेत. थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चौघांना यश आले आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या रुपाने शिवसेनेचा जिल्हा बँकेत प्रवेश झाला आहे. बिनविरोध होऊ न शकलेली पारनेरमधील एक जागा चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती. तेथे दत्ता पानसरे यांच्यासाठी विखेंनी जोर लावला होता. खासदार डॉ.सुजय विखे-पाटील स्वत: पारनेरमध्ये तळ ठोकून होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना उभे करण्यात आले होते. त्यांच्यासाठी स्वत: अजित पवार मतदारांशी संपर्क ठेवून होते. अखेर या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे गायकवाड विजयी झाले.

अशीच लक्षवेधक लढत नगर तालुक्यात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबाबतीत झाली. बिनविरोध निवडणूक करताना कर्डिले यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भाजपने त्यांना निवडणूक समितीवर घेतले होते, मात्र असे असूनही त्यांनी थोरातांच्या बैठकीला हजरी लावली होती. त्यानंतर पुढे दोन्ही बाजूंनी त्यांच्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसले. मात्र, वर्षानुवर्षे बँकेत वर्चस्व असलेल्या कर्डिले यांनी स्वत:च्या हिमतीवर याहीवेळी निवडणूक जिंकली. ते भाजपचे असले तरी विखेंचे विरोधक मानले जातात. पवारांचा विखेंवर राग आहेच. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच माजी आमदारांनी विखेंवर पाडापाडीचा आरोप केला होता. त्यावेळी पक्षाकडे तक्रार करण्यात आली, समिती नियुक्त करून चौकशीही झाली. मात्र, पुढे काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे भाजपच्या त्या नेत्यांच्या मनात विखेंबद्दलचा राग कायम राहिला. त्याचा बदला घेण्याची संधी त्यांनी या निमित्ताने साधल्याचे दिसून येते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊनही या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावरुन जिल्हा बँकेत विखे विरूद्ध थोरात आणि बाकी सर्व असे राजकारण चालते. बहुतांश वेळा थोरात यशस्वी होतात. यावेळीही त्यांनी पवार आणि भाजपच्या असंतुष्ट नेत्यांच्या मदतीने विखेंना दूर ठेवण्यात यश मिळविले आहे.
