जलजीवन मिशनमधून वाकी गावचा पाण्याचा प्रश्न मिटणार ः पिचड बाजीराव दराडे आणि सुनीता भांगरे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
नायक वृत्तसेवा, अकोले
जलजीवन मिशनमधून प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाकी गावचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा विश्वास माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे आणि सुनीता भांगरे उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अकोले तालुक्यातील वाकी येथे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1 कोटी 10 लाख 850 रुपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, सुनीता भांगरे, सुषमा दराडे, भाऊराव जाधव, भरत घाणे, सुरेश गभाले, बारीचे सरपंच तुकाराम खाडे आदी उपस्थित होते.
प्रास्तविक वाकीचे सरपंच राजाराम झडे यांनी केले. तर माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांनी 1990 पासून वाकी गावाला नेहमीच झुकते माप दिल्याचे भाऊराव जाधव म्हणाले. राज्यात आपले सरकार आले असून निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास बाजीराव दराडे यांनी व्यक्त केला. वाकी गावापेक्षा वाकी फाटा येथे पर्यटकांची व प्रवाशांची मोठी गर्दी वाढत असून त्याचा तरुणांनी लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवावा, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. शेवटी सुरेश गभाले यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास माजी आमदार वैभव पिचड, सुनीता भांगरे व बाजीराव दराडे एकत्र आले होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, अगस्ति कारखाना निवडणुकीत आम्ही शब्द पाळल्याने सुनीताताई बिनविरोध संचालक झाल्या. आता उपाध्यक्ष पदालाही आमच्या शुभेच्छा असल्याचे वैभव पिचड म्हणाले.