भ्रष्टाचार दडवण्यासाठीच अमोल खताळ यांच्यावर आरोप चिकणीच्या ‘स्मशानभूमी’त राजकारणाची चिता पेटली; ज्येष्ठ कार्यकर्ते वाल्मिक शिंदे यांचे प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाजप कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गावात येऊन नूतनीकरण झालेल्या स्मशानभूमीच्या कामाची तोडफोड केली व स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप करीत चिकणीत ग्रामसभा घेऊन निषेधाचा ठराव करण्यात आला. याप्रकरणी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे यांनी तालुका पोलिसांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर त्यांच्या या आरोपांना भाजपचे स्थानिक ज्येष्ठ कार्यकर्ते वाल्मिक शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुशोभीकरणासाठी नामदार राधाकृष्ण विखे यांनी आपल्याच पाठपुराव्यातून निधी मंजूर केला. त्याचा ठेका काँग्रेसच्या कार्यकर्त्यासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला व त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले. हा विषय खताळ यांच्यासह आपण चव्हाट्यावर आणल्यानेच तो दडवण्यासाठी काँग्रेसकडून खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप घणाघात शिंदे यांनी केला आहे.

याबाबत शिंदे यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात चिकणी गावातील विविध विकासकामांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करुन आपण निधीची मागणी केली होती. त्यानुसार गावातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला. त्याचे काम गावातील काँग्रेसचा कार्यकर्ता व काही ग्रामपंचायत सदस्यांनी भागीदारीमध्ये घेतला. मात्र, सुरू असलेल्या कामात केवळ पैसा कमावणे इतकाच उद्देश असल्याने चक्क स्मशानभूमीच्या कामातही निकृष्टपणा दाखवण्यात आला.

सदरची बाब लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी या कामाचा ठेकेदार दर्शन वर्पे याला जाब विचारला. त्यावेळी झालेल्या संभाषणात वर्पे याने शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली व गलिच्छ शब्दांत शिवीगाळही केली. त्यामुळे व्यथित झाल्याने शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे संगमनेर येथील कार्यकर्ते अमोल खताळ यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार खताळ यांनी ३ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीचे उपअभियंता (बांधकाम) नाना अहिरे यांना फोन करुन तोंडी व मेसेजद्वारे तक्रार केली. मात्र, त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शिंदे यांच्या विनंतीवरुन खताळ काही कार्यकर्त्यांसह ९ ऑक्टोबर रोजी चिकणी येथे कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

यावेळी तेथे जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खताळ यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना उपसरपंचांच्या सहीने सदरचे काम सुरू असल्याचे सांगितले. झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणीतून दिसून आल्याने त्यांनी देखील ते मान्य केले होते. तेथे उपस्थित असलेल्या ग्रामसेवकांनी निकृष्ट काम झालेले असल्याने संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करणार नसल्याचे सांगत त्याच्याकडून पुन्हा सर्व काम दर्जेदार करुन घेणार असल्याचे त्यांच्यासमोर सांगितल्याचा दावा शिंदे यांनी पत्रकातून केला आहे.

चिकणी गावात सत्तेचा गैरवापर कोण करीत आहे हेच स्थानिकांना माहीत आहे. निषेधाचा ठराव घेताना कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नियंत्रण पथक करुन तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारे उघडे पडले असते. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल असा निर्धार अमोल खताळ यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पक्षात येणार्यांची संख्या वाढत असल्याने काही जणांचे पोटशूळ उठल्याचा गंभीर आरोपही वाल्मिक शिंदे या प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

वाल्मिक शिंदे यांनी ९ ऑक्टोबर रोजी अमोल खताळ यांच्यासह केलेल्या पाहणी दौर्याची छायाचित्रे व ध्वनिचित्रफीत माध्यमांना उपलब्ध करुन दिली आहे. या सर्व प्रकारातून चिकणीची स्मशानभूमी काँग्रेस आणि भाजपातील आरोप-प्रत्यारोपातून केंद्रस्थानी आली आहे. त्यातूनच ९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या प्रकरणाची लेखी तक्रार २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, त्याला २८ ऑक्टोबर रोजी शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांतील या घडामोडींमुळे सध्या चिकणीच्या स्मशानभूमीत राजकीय चिताच धगधगताना दिसत आहे.
