कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पालिकेचे राजकारण पेटले! अमरधामच्या कामाचा पंचनामा करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुमारे 63 लाखांहून अधिक खर्च केल्यानंतर पूर्ण झालेल्या कामांच्या नावाने काढण्यात आलेल्या 33 लाख 99 हजार 969 रुपयांच्या निविदांचा मुद्दा वादग्रस्त ठरला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले आहे. हाच धागा धरुन भारतीय जनता पार्टीसह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली असून संगमनेरच्या हिंदू स्मशानभूमीच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी, पंचनामा व दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाच्या आजच्या दुसर्या दिवशी आंदोलकांनी ‘गेटबंद’चा इशारा दिल्याने सकाळपासूनच पालिकेत पोलिसांचा वावर वाढला होता. कारवाई न झाल्यास गुरुवारपासून आमरण उपोषणाचा इशाराही आंदोलकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत संगमनेर नगरपालिकेने सन 2019 साली संगमनेरातील एकमेव असलेल्या हिंदू स्मशानभूमीच्या (अमरधाम) सुशोभीकरणासाठी 63 लाख 19 हजार 733 रुपयांची निविदा काढली होती. त्यातून अमरधामच्या वाढीव बांधकामासह सुशोभीकरणाचे कामही करण्यात आले. मात्र हे काम झाल्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी पालिकेच्या बांधकाम विभागाने 16 नोव्हेंबर, 2021 रोजी एकाच दिवशी अमरधामच्याच कामासाठी 24 लाख 88 हजार 442 रुपये व 9 लाख 16 हजार 66 रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा काढल्या. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत एकाच कामासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून तब्बल 97 लाख 24 हजार 241 रुपयांच्या एकूण तीन निविदा काढण्यात आल्या.

सन 2019 मध्ये पालिकेने काढलेल्या 63 लाख 19 हजार 733 रुपयांच्या पहिल्या निविदेतून संगमनेरातील हिंदू स्मशानभूमीचे काम पूर्ण झालेले असताना दोन वर्षांनंतर त्याच कामासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने 24 लाख 88 हजार 442 रुपये व 9 लाख 16 हजार 66 रुपये अशा एकूण 33 लाख 99 हजार 969 रुपयांच्या निविदा पुन्हा काढल्याने त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. अमरधामच्या सुशोभीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून (ता.28) पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच साखळी उपोषणाला सुरुवात केली.

या दरम्यान नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी आंदोलनस्थळी जावून आंदोलकांशी चर्चा करीत मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र जोपर्यंत अमरधाममध्ये झालेल्या कामांचा पंचनामा होत नाही, काम होवूनही पुन्हा काढलेल्या निविदांची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकार्यांचा त्यामागील हेतू स्पष्ट होत नाही व या कथित भ्रष्टाचारात हात बरबटलेल्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करुन संबंधित ठेकेदाराला कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. दिवसभराच्या आंदोलनानंतरही पालिकेकडून याबाबत ठोस कारवाईचे आश्वासन न मिळाल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलकांनी पालिकेत जावून बुधवारी (ता.29) पालिकेचे ‘गेटबंद’ आंदोलन करणार असल्याचे निवेदन त्यांना सोपविले.

त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी आज सकाळपासूनच पालिकेच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी थेट मुख्याधिकार्यांच्या दालनात जावून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. बराचवेळ चर्चा होवूनही मार्ग निघत
नसल्याने अखेर आंदोलकांनी निर्णय होईस्तोवर मुख्याधिकार्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या दिला. या दरम्यान माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांनी आंदोलकांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही असफल झाला. आंदोलकांच्या मागणीनुसार अमरधाममध्ये झालेल्या कामाचा पंचनामा करण्याबाबत मुख्याधिकार्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असली तरीही त्यावर कृती करण्यात मात्र उशीर होत गेल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती आलेला ज्वलंत विषय भाजत ठेवण्यासाठी भाजपाने गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु करण्याचीही घोषणा केली. त्यामुळे हा विषय पुढील काही दिवस असाच ज्वलंत राहण्याचीही शक्यता आहे.

संगमनेरमधील अमरधामच्या कामात सुमारे 34 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत अमरधाममध्ये झालेल्या कामाचा पंचनामा करावा ही आमची कायदेशीर मागणी आहे, मात्र पालिकेकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे पालिका आपल्या भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालीत असल्याचे दिसत आहे. मात्र जोपर्यंत अमरधाममधील कामांचा पंचनामा, चौकशी व कारवाई होत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत.
– जावेद जहागिरदार (भाजपा नेते)

